दिंडोरी – क्रांती दिन व जागतिक आदिवासी गौरव दिन निमित्त रक्तदान शिबिर आयोजित करून सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या दिंडोरी शिक्षक संघाचे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष आमदार नरहरी झिरवाळ यांनी केले.
दिंडोरी पंचायत समिती सभागृहात झालेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन झिरवाळ यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून कृउबा समिती उपसभापती अनिल देशमुख, दिंडोरी पंचायत समितीचे सभापती कामिनी चारोस्कर, उपसभापती वनिता अपसूंदे, पंचायत समिती सदस्य वसंतराव थेटे, संगीता घिसाडे, विठ्ठलराव अपसुंदे, शंकर चारोस्कर, शिक्षक संघाचे राज्य कार्याध्यक्ष अंबादास वाजे, जिल्हाध्यक्ष आर के खैरनार, दिंडोरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चंद्रकांत भावसार, गटशिक्षणाधिकारी भास्कर कनोज आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
सर्वप्रथम झिरवाळ यांच्या हस्ते जननायक बिरसा मुंडा व महात्मा गांधी यांचे प्रतिमापूजन करण्यात आले. रक्तदान करणाऱ्या दात्यांना शिक्षण विभागाच्या वतीने सन्मानपत्र देण्यात आले. व्यासपीठावर शिक्षक संघाचे राज्य सदस्य मिलींद गांगुर्डे, एनडीपीटी चे माजी चेअरमन दीपक सोनवणे, माजी व्हा चेअरमन सोमनाथ पवार, संचालक उमेश बैरागी, शरद बरमे, नाशिक तालुका अध्यक्ष प्रदीप पेखळे आदी उपस्थित होते. शिबिरात १०१ शिक्षकांनी रक्तदान केले.
रक्त संकलन साठी अर्पण रक्तपेढीच्या किरण जाधव, डॉ अनिल धनवट आदींसह टीमने परिश्रम घेतले. कोरोना योद्धा बनलेल्या शिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते समाज रक्षक प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. शिक्षक संघाचे अध्यक्ष सचिन वडजे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन तालुका नेते धनंजय वानले यांनी केले तर आभार सरचिटणीस योगेश बच्छाव यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी विभागीय सरचिटणीस प्रमोद शिरसाट, नंदकुमार गांगुर्डे, प्रदीप मोरे, दत्तात्रय चौगुले, श्रावण भोये, नरेंद्र आहेर, नियाज शेख, मधुकर आहेर बाळासाहेब बर्डे ,कैलास पाटोळे, विलास जमदाडे, शांताराम आजगे, परशुराम कवर आदींनी परीश्रम घेतले.