दिंडोरी : कोविडच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची मागणी वाढत ऑक्सिजन पुरवठा कमी होऊ लागल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले असताना विधानसभा हंगामी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करतानाच दिंडोरी तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांना त्यांचेकडे उपलब्ध ऑक्सिजन सिलेंडर देण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत एकच दिवसात तब्बल ७५ जम्बो सिलेंडर दिंडोरीचे तहसीलदार पंकज पवार यांचेकडे सुपूर्त केले आहे.
ऑक्सिजन सिलेंडर पुरवठा कमी होत असल्याने अनेक हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन टंचाई भासू लागली होती. याबाबत सर्व डॉक्टरांनी झिरवाळ यांना ऑक्सिजन उपलब्ध करून देण्याचे साकडे घातले होते. त्यानुसार झिरवाळ यांचा वरिष्ठ पातळीवर सातत्याने पाठपुरावा सुरू होता. एखाद्या हॉस्पिटलमध्ये वेळेत ऑक्सिजन न पोहोचल्यास अनेकांचा जीव टांगणीला लागणार होते. त्यामुळे झिरवाळ यांनी तातडीने प्रांताधिकारी डॉ संदीप आहेर तहसीलदार पंकज पवार यांचे सोबत चर्चा करत काही उद्योजकांशी बोलत त्यांचेकडे उपलब्ध ऑक्सिजन या कठीण प्रसंगी देण्याचे आवाहन केले. त्यास उद्योजकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. प्रांताधिकारी संदिप आहेर तहसीलदार पंकज पवार यांनी सर्व उद्योजकांशी संपर्क साधत ऑक्सिजन सिलेंडर देण्याचे आवाहन केले. दिंडोरी तहसील कार्यालयात काही तासात ७५ जम्बो ऑक्सिजन सिलेंडर जमा झाले. ते आता गरजेनुसार वेगवेगळ्या हॉस्पिटलला पुरवले जाणार आहे. राज्यात आदर्शवत असा प्रतिसाद उद्योजकांनी दिल्याबद्दल विधानसभा हंगामी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी त्यांचे आभार मानत इतर उद्योजकांनीही त्यांचेकडे असलेली ऑक्सिजन सिलेंडर हॉस्पिटलला पुरवून कोविडच्या या लढ्यात योगदान द्यावे असे आवाहन केले.