दिंडोरी : ग्रामीण भागात रेमडेसिविर व ऑक्सीजन साठा तत्काळ उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी माजी आमदार रामदास चारोस्कर यांनी शासनाकडे केली असून दिंडोरी तालुक्यासह मतदार संघातील कोरोना रुग्णांचे हाल थांबविण्याचेही त्यांनी मागणी केली आहे.
सध्या शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढल्याने खाटा अपुर्या पडू लागल्या आहेत. दिंडोरी शहरात खाजगी रुग्णालयामध्ये जागा शिल्लक नाही तर इतर कोविड सेंटरमध्येही रुग्णांना वाट पाहावी लागत आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत वाढल्याने शासनाने अगोदरच सज्जता ठेवायला हवी होती. सध्या दिंडोरी शहरात कोविड रुग्णालय स्थापन करणे अत्यंत गरजेचे आहे. त्या दिशेने शहरातील तीन ते चार जागा तत्काळ पाहणी करुन एका ठिकाणी रुग्णालय करावे. दुसरीकडे रेमडेसिविर हे इंजेक्शन नातलगांनाच आणावे लागत आहे. खाजगी कोविड सेंटरचे डॉक्टर नकार देत असून नातेवाईकांनाच इंजेक्शन शोधायला लावत आहे. त्यामुळे नातेवाईक पूर्ण हतबल झाले आहे. याकामी जिल्हाधिकार्यांनी तातडीने लक्ष घालून खाजगी डॉक्टरांना गतीमान करण्याची गरज निर्माण झाली आहे. शासकीय यंत्रणेने ग्रामीण जनतेचे हाल थांबवावे, अशी मागणी माजी आमदार रामदास चारोस्कर यांनी केली आहे.