दिंडोरी :केंद्रशासनाच्या पीएम किसान योजनेच्या मिळालेल्या दोन हजार रुपयांची वसुलीच्या विरोधात दिंडोरीत राष्ट्रवादी युवकच्या वतीने आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारने नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेत अपात्र ठरवत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केलेले दोन हजार रुपये परत घेण्यासाठी ससेमिरा लावून नोटिसा दिल्या आहे. केंद्र शासनाच्या या धोरणाविरुद्ध दिंडोरी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जेष्ठ नेते श्रीराम शेटे, युवक प्रदेश सरचिटणीस प्रतीक मोहिते यांच्या प्रमुख उपस्थितीत आंदोलन करत तहसीलदार पंकज पवार यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी युवक प्रदेश सरचिटणीस जिल्हा प्रभारी प्रतीक मोहिते,जेष्ठ नेते श्रीराम शेटे, प्रदेश उपाध्यक्ष सचिन पिंगळे,राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, जेष्ठ नेते विश्वासराव देशमुख, युवक तालुका अध्यक्ष शाम हिरे आदीसह पदाधिकारी उपस्थित होते. निवेदनात म्हंटले आहे की, केंद्र सरकारने नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेत जे काही अपात्र ठरवले आहे. त्या शेतकऱ्यांना मिळालेल्या किमान दोन हजार रुपयांची वसुलीसाठी ससेमिरा सुरू केला आहे. शेतकरी अडचणीत आहे, अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. अशा अडचणीच्या काळात शेतकरी हवालदिल झाला असता हुकूमशाही पद्धतीने आत्तापर्यंत कुठल्याही केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या बाबतीत वापरली नाही ही अशी पद्धत वसुलीसाठी वापरली आहे. अशा वसुलीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने येणाऱ्या कालावधीत तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देत निषेध करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.