दिंडोरी- शिवरायांचे विचार पुढील हजारो वर्षासाठी प्रेरणा बनवून राहतील. मनाभोवती अंधार दाटला अथवा संकटे आली तर शिवरायांचं चरित्राचा अभ्यास करून मार्गक्रमण करावे. शिवाजी महाराजांसारखे निर्व्यसनी जीवन जगून जातपात विरहीत न्यायधिष्ठीत हिंदवी स्वराज्य स्थापन करणा-या शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाचे विवीध पैलुंचा आपण अभ्यास केला पाहिजे.असे आवाहन व्याख्याते अशोकराव शिंदे सर यांना या प्रसंगी केले.
कादवा सहकारी साखर साखर कारखाना राजारामनगर मातेरेवाडी आयोजित शिवजन्मोत्सव प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कार्यकारी संचालक हेमंत माने होते. या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी कारखान्याचे चीफ इंजिनिअर विजय खालकर,चीफ केमिस्ट सतीश भामरे,कामगार युनियन अध्यक्ष दत्तात्रेय वाकचौरे,सल्लागार बाळासाहेब उगले,जगन्नाथ शिंदे,कामगार कल्याण अधिकारी गोडसे,वैद्यकीय अधिकारी डॉ प्रदीप तिडके,स्थापत्य अभियंता शरदचंद्र चव्हाणके,शेतकी अधिकारी मच्छिंद्र शिरसाठ, सी.बी.जाधव,उपलेखापाल सत्यजित गटकळ,सचिव राहुल उगले,युनियन सरचिटणीस संतोष मातेरे सर्व पदाधिकारी अधिकारी कामगार उपस्थित होते.
या पुढे शिंदे म्हणाले की शिवरायांची राज्यव्यवस्था लोकनिष्ठेच्या पोलादी खांबावर भक्कम उभी होती म्हणुन शिवरायांचं स्वराज्य प्रत्येकालाच आपलं वाटत होतं.शिवाजी महाराजांचा इतिहास शौर्याचा,धाडसाचा आणि पराक्रमाचा इतिहास आहे. पण हा इतिहास केवळ तलवारीच्या पात्यावर अवलंबून नव्हता तर तो त्यांच्या विलक्षण बुद्धिमत्तेवर अवलंबून होता.छत्रपती शिवाजी महाराज ही एक कृतीशील विचारधारा होती. म्हणुन शिवरायांचे गुण आत्मसात करून शिवरायांसारखे आदर्श जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.