दिंडोरी – तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात सध्या नरभक्षक बिबटे मुक्त संचार करीत असल्यामुळे शेतकरी वर्गासह मजुंरामध्ये दिवसेंदिवस भितीचे वातावरण निर्माण झाले असून या परिसरातील बिबट्यांची दहशत केव्हा संपणार असा सवाल शेतकरी वर्गाकडून केला जात आहे. दिंडोरी तालुक्यातील पश्चिम भागातील ओझे, नळवाडी लखमापूर, म्हेळुस्के, अवनखेड, करंजवण , दहेगाव, वागळूद, परमोरी, इ.भागात बिबट्यांचे मुक्त संचार नागरिकांना रोज पाहायला मिळत आहे. वनविभागाकडे वेळोवेळी तक्रार करुनही दखल घेतली जात नाही त्यामुळे दिंडोरी तालुक्यात सध्या लोकांच्या जिवापेक्षा बिबट्याला अधिक महत्व प्राप्त झाल्यामुळे वनविभाग तालुक्यातील कादवा नदी परिरातील गावांमध्ये मागणी करूनही पिंजरे लावण्यास टाळाटाळ करीत असल्यांचे शेतकरी वर्गाकडून बोलले जात आहे. तालुक्यात सध्या रब्बी हंगामातील गहू ,हरबरा, पेरणी चालू असून महावितरण कंपनी कडून आठवड्यातून चार दिवस शेतक-यांना कृषीपंपासाठी रात्रीच्या वेळी थ्री फेंज वीजपुरवठा केला जाते त्यांमुळे बिबट्याची व महावितरण कंपनीची दहशत सारखीच झाली आहे. रात्री बाहेर न गेलास पिकाला पाणी देता येत नाही आणि बाहेर गेलो तर बिबटयाची भिती आशा विचित्र परिस्थितीमध्ये येथील शेतकरीवर्ग सापडला आहे.
आता पर्यंत बिबट्यांनी लहान बालके,बक-या ,कुत्रे,गाई,वासरे,घोडे इ.ना आपले भक्ष बनविले असून वाड्या ,वस्ती वर राहाणारी जनता त्रासुन गेली आहे. बिबट्यांनी कुत्र्यावर हल्ले मोठ्या प्रमाणावर केल्याने ,दिवसेंदिवस गावांगावातील कुत्र्याची संख्या कमी होत आहे. तसेच बरीच ठिकाणी नुकत्याच जन्माला आलेल्या वासरे ही खाल्ले आहे. त्यामुळे दुध व्यवसाय करणारे शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला आहे. नुकतेच काल परवा बिबट्यांने वासरु व घोडा यांच्या वर हल्ला करून त्यांना ठार केले आहे.
या पश्चिम पट्ट्यात बिबट्यांची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या रब्बी हंगामातील शेतीतील कामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून अचानक बिबट्या केव्हा हल्ला करील या भीतीने बळीराजा त्रासुन गेला आहे. या परिसरातील नागरिकांकडून या मुक्तसंचार करणा-या बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागान पिंजरा लावण्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच बिबट्यांने हल्ला केलेल्या शेळी,वासरे ही मरण पावले आहे. याची भरपाई वनविभागाने त्वरित द्यावी व ठिकठिकाणी पिंज-याची संख्या वाढवावी ही मागणी जोर धरती आहे.