दिंडोरी : तालुक्यातील ६० ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच निवडणुकीत गालबोट लागले असून महाजे येथे निवडणुकी दरम्यान हाणामारी दगडफेक झाली आहे. तर अवनखेड व कादवा म्हाळुंगी येथे कुणीही अर्ज दाखल न केल्याने निवडणूक तहकूब झाली आहे. मंगळवारी पुन्हा निवडणूक होणार आहे. अन्य ५७ ठिकाणी शांततेत निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे.
महाजे येथे बहुमतातीतील सदस्यांना विरोधी गटातील सदस्यांनी रोखण्याचा प्रयत्न केला. सरपंच पदाच्या महिला उमेदवारास मारहाण व जीवे मारण्याचा प्रयत्न झाला मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत पुढील अनर्थ टळला. तणावग्रस्त परिस्थितीत निवडणूक प्रक्रिया पार पडली. तर अवनखेड येथे सरपंच पदासाठी आरक्षित अनुसूचित जाती महिला उमेदवार नसल्याने येथे विहित वेळेत कुणीही अर्ज न भरल्याने निवडणूक तहकूब झाली. मंगळवारी पुन्हा निवडणूक होणार आहे. सदर प्रवर्गातील महिला सदस्य नसेल तर त्याच प्रवर्गातील पुरुष सदस्य सरपंच पदासाठी अर्ज भरू शकतो असे प्रशासनाने सांगितले आहे. कादवा म्हाळुंगी येथे सरपंच उपसरपंच पदावरून पॅनल मध्ये फूट पडल्याने सदस्यांना ग्रामपंचायत कार्यालयात जाताना तणावपूर्ण वातावरण होते. कुणीही अर्ज न भरल्याने येथील निवडणूक स्थगित झाली असून मंगळवारी पुन्हा निवडणूक होणार आहे.