दिंडोरी – देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याचे भाव वाढत असतानाच केंद्र सरकारने सलग दुस-या वर्षी कांदा निर्यातबंदीची घोषणा केली असल्याच्या निषेधार्थ दिंडोरी येथील नाशिक कळवण राज्य मार्गावर शिवसेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आला. यावेळी केंद्र सरकारचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी तहसीलदार पंकज पवार यांना निवेदन देण्यात आले.
आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ म्हणून नाशिकची ओळख आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात बहुसंख्य शेतकरी कांदा उत्पादक असून येथे मोठ्या प्रमाणात दर्जेदार कांदा पिक घेतले जाते. सध्या भरपूर प्रमाणावर कांदा शेतकऱ्यांकडे पडून आहे. आधीच लॉकडाउनच्या संकटकाळातून शेतकरी वर्ग, सावरत असतांना ही अचानक केलेली निर्यातबंदी अन्यायकारक ठरली असल्याचे निवेदनात नमुद करण्यात आले आहे. यावेळी माजी आमदार धनराज महाले,जेष्ठ नेते सुरेश डोखळे आदींनी केंद्राच्या निर्णयावर जोरदार टीका करत केंद्र सरकारने त्वरित निर्यातबंदी मागे घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली याप्रसंगी माजी आमदार धनराज महाले, जेष्ठ नेते सुरेश डोखळे, तालूका प्रमुख सतिश देशमुख, पांडूरंग गणोरे,सुरेश देशमुख यांच्यासह शिवसेना, युवासेना, महिला आघाडी तालुका व शहर पदाधिकारी, कांदा उत्पादक शेतकरी उपस्थित होते.