दिंडोरी – स्वातंत्रदिनानिमित्त येथे कृषी विभागातर्फे रानभाज्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले त्यास नागरिकांनी प्रतिसाद देत भाज्यांची माहिती करून घेतली. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचे प्रेरणेतून आणि स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आज (१५ ऑगस्ट) दिंडोरी तहसिल कार्यालयाच्या आवारात तालुका कृषी विभागाचे वतीने रानभाज्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले. प्रदर्शनात देविदास महाले (रा.देवळीचापाडाः यांच्या शेतकरी गटाने रानभाज्या उपलब्ध करून दिल्या. तसेच भेट देणाऱ्या ग्रामस्थ व अधिकारी वर्गाला रानभाज्यांची माहिती दिली. या उपक्रमास प्रांताधिकारी संदीप आहेर व तहसिलदार कैलास पवार यांनी स्टॉल ला भेट देत आदिवासी शेतकरी बांधवांचा सत्कार देखील केला. सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात आरोग्यासाठी रानभाज्या अत्यंत उपयुक्त असून भविष्यात याच प्रकारे दिंडोरी तालुक्यात धान्य महोत्सव भरवण्याचा मानस असल्याचे तालुका कृषी अधिकारी अभिजीत जमधडे यांनी सांगितले. यावेळी कृषी विभागाचे सर्व अधिकारी, गट विकास अधिकार चंद्रकांत भावसार, इतर सर्व विभागाचे अधिकारी देखील उपस्थित होते.