दिंडोरी – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि नदी प्रदूषण टाळण्यासाठी मूर्ती संकलन उपक्रमाला दिंडोरीकरांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आहे. यंदा अत्यंत साधेपणाने गणरायाला निरोप दिला जात आहे.
गणेश विसर्जन करताना काळजी घेण्यासाठी दिंडोरी नगरपंचायत तर्फे नागरिकांना घरीच विसर्जन करावे असे आवाहन करण्यात आले. तसेच, विसर्जन रथद्वारे गणेश मूर्ती संकलन करण्यात येत आहे. या उपक्रमास दिंडोरीकरांनी प्रतिसाद दिला आहे. नगराध्यक्ष रचना जाधव, उपनगराध्यक्ष कैलास मवाळ, मुख्याधिकारी नागेश येवले यांच्या आवाहनाला दिंडोरीकरांनी पाठिंबा दिला आहे.
यंदा प्रथमच कोणत्याही मिरवणूक वाद्याविना गणरायाला निरोप दिला जात असून आरती करत प्रसाद वाटप करण्यात येऊन गणेश मूर्ती संकलन केंद्रात जमा करण्यात येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेश विसर्जन करताना संसर्ग वाढू नये यासाठी यावर्षी शक्यतो नदीत बंधाऱ्यात गणेश विसर्जन करू नये यासाठी प्रशासनाने आवाहन केले असून त्यादृष्टीने दिंडोरी नगरपंचायत ने विविध पर्यायी व्यवस्था उपलब्ध केली आहे दिंडोरी नगरपंचायत तर्फे शक्यतो नागरिकांनी स्वतःच्या घरीच गणेश विसर्जन करण्याचे आवाहन केले आहे. नगरपंचायत तर्फे गणेश विसर्जन रथ बनविण्यात येऊन तो प्रत्येक गल्लीत फिरत त्यात गणेश मूर्ती संकलित करण्यात येत आहेत. तसेच शहरात रामेश्वरी बंधारा, ज्ञानदा क्लासेस जवळ, शिवाजी नगर, कादवा नगर अंगणवाडी, कोंगाई माता मंदिर निळवंडी रोड या ठिकाणी पाण्याच्या टाक्या ठेवत गणेश मूर्ती संकलन केंद्र स्थापित करण्यात आले. तेथे गणेश मूर्ती संकलित करण्यात येत आहे. येथील टाकीतील पाण्यात विधिवत विसर्जन करत मूर्ती,निर्माल्य संकलित करण्यात येत आहे. शहरातील विविध सार्वजनिक गणेश मंडळांनी यावर्षी साधेपणाने उत्सव साजरा करत प्रशासनाच्या आवाहनाला नागरिकांनी प्रतिसाद दिला आहे.