दिंडोरी – शहरासह तालुक्यातील बहुतांशी गावांमध्ये मुसळधार पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले जोरदार पावसाने टोमॅटोसह विविध पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आज दुपार पासून मुसळधार पाऊसाला सुरुवात झाली असून नदी नाल्याना पूर आल्यामुळे हे सर्व पाणी पालखेंड धरणात जमा होत असल्यामुळे पालखेंड धरण १०० टक्के भरले असून धरणातून कादवा नदी पात्रात दहा हजार पाचशे क्युसेस इतक्या पाणीचा विसर्ग सोडण्यात आला आहे. त्याप्रमाणे दिंडोरीच्या तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये ही पाऊसाचा जोर वाढत असल्यामुळे पालखेंड धरणातून अजून पाणी वाढविण्याची शक्यता आहे अशी माहिती पालखेंड शाखा अभियंता सानप यांनी दिली. नदी काठच्या ग्रामस्थांनी सावधान राहत काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
दिंडोरी शहरात जनजीवन विस्कळीत नाशिक कळवण रस्त्यावर पाणी वाहतूक ठप्प
दिंडोरी शहरात दुपारी १२ पासून जोरदार पाऊस सुरू झाल्याने सर्वत्र पाणीपाणी झाले निळवंडी रस्त्यावर पाणी साचले नाशिक कळवण रस्त्यावरही ठिकठिकाणी पाणी आल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला.तर रणतळ येथे रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक सुमारे एक तास पूर्ण ठप्प होती शहरातील धामण नदीला प्रथमच पूर आला .सुमारे चार तास पाऊस सुरू असल्याने शहरातील जनजीवन विस्कळीत झाले.