दिंडोरी – दिंडोरीच्या एका प्रतिष्ठित उच्च शिक्षित डॉक्टरकडून कोरोना बाधित रुग्ण व त्यांच्या संपर्कात आलेल्या कुटूंबीयातील व्यक्तींची माहिती संकलित करण्यासाठी घरी आलेल्या आरोग्य सेवक, आशा प्रवर्तक यांना शिविगाळ करुन अंगावर धाऊन जाण्याचा प्रकार शिवाजीनगर भागात घडला. याप्रकरणी दिंडोरी पोलिसात डॉक्टर व आई विरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत दिंडोरी पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, दिंडोरीच्या शिवाजीनगर भागत राहणारे एक डॉक्टर यांना कोरोनाची लागण होवून त्यांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे डॉक्टर व त्यांच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील व्यक्तींची कंटेंटमेंट झोन तयार करण्यासाठी व माहिती संकलित करण्यासाठी डॉक्टरांच्या शिवाजीनगर येथे असलेल्या निवासस्थानी आरोग्य सेवक ए.ए.सय्यद, राजेंद्र जगताप, गट प्रवर्तक ज्योती जाधव ,आशा कार्यकर्ती अश्विनी गांगुर्डे हे गेले. येथे या सर्व कर्मचा-यांवर डॉक्टराने अर्वाच्य भाषेत शिविगाळ करत अंगावर धावून जात मारहाण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी परत घराकडे फिरकले तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तर डॉक्टरांच्या आईने आपटून आत्महत्या करण्याची धमकी देत आरोग्य सेवकांना माघारी परतण्याचे सांगत आरडाओरड केली.
या घटनेनंतर तळेगाव दिंडोरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे उपकेंद्र दोनचे आरोग्य सेवक अमजद अहेमद सय्यद राहणार पखालरोड, जुने नाशिक यांनी फिर्यांद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून दिंडोरी पोलिसांनी कोरोना संसर्ग पसरविण्याची हयगईची व घातक कृती करुन शासनाचा विविध आदेशाचा भंग केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. डॉक्टरांचे निवासस्थान व हॉस्पिटल परिसर सील करण्यात आले असून परिसर कंटेंटमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.