दिंडोरी :- सर्वसामान्य नागरिकांनी शासकीय अधिकाऱ्यांना आपल्या कामकाजाबाबत जाब विचारणे हा देखील गुन्हा झाला असून विनाचौकशी सर्वसामान्य नागरीकांवर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हे दाखल होत असून चौकशी शिवाय असले गुन्हे दाखल होवू नये या मागणीसह दिंडोरीचे पोलिस निरीक्षक अनिलकुमार बोरसे यांची बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी दिंडोरीच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळ पोलिस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर यांची भेट घेतली.
सर्वसामान्य नागरिकांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना जावून आपल्या न झालेल्या कामकाजाबद्दल अथवा चुकीच्या कामकाजाबाबत जाब विचारणे हा सर्वसामान्यांसाठी गुन्हा झाला असून आपल्या चुकीच्या कामकाजाला लपवण्यासाठी प्रशासकीय अधिकारी सरकारी कामात अडथळा निर्माण करण्याबाबत गुन्हे दाखल करत आहे. हे नक्कीच चुकीचे असून यावर रीतसर चौकशी करूनच गुन्हे दाखल व्हावे. चुकीचे गुन्हे दाखल होवू नये. यासाठी नाशिकचे पोलिस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर यांची दिंडोरी येथील सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्यावतीने माजी जि. प. उपाध्यक्ष प्रकाश वडजे, शिवसेना नेते प्रविणनाना जाधव, स्वाभिमानी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष संदीप जगताप, भाजप तालुकाध्यक्ष नरेंद्र जाधव, शिवसेना तालुकाप्रमुख पांडुरंग गणोरे, राजु उफाडे, गंगाधर निखाडे, वसंत कावळे,अमोल देशमुख, शेतकरी निवृत्ती बोराडे, अमोल जाधव, पंढरीनाथ ढोकरे, शरद बोढाई, नानासाहेब जाधव, अमोल गणोरे, राजेंद्र गणोरे यांनी घेतली.
दिंडोरी येथील शेतकऱ्याला अर्वाच्य भाषेत शिविगाळ केल्यावरून शेतकरी व दिंडोरी विद्युत वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता यांच्यावरील संतापाची लाट पसरली असून सर्वस्तरातून या मुजोर अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई व्हावी या मागणीचा जोर धरला आहे. चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल होवू नये याबाबत सविस्तर चर्चा यावेळी करण्यात आली. तसेच दिंडोरीचे पोलिस निरीक्षक यांनी शेतकऱ्यावर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याबाबत गुन्हा दाखल न केल्यामुळे त्यांची तात्काळ बदली करण्यात आल्याने जनतेमध्ये चुकीचा संदेश गेला आहे. यामुळे वरिष्ठांच्या कारवाईबाबत शंका उपस्थित होत असल्याने संबंधित पोलिस निरीक्षक यांना पुन्हा दिंडोरीत रूजू करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी पोलिसांकडून चुकीचे गुन्हे दाखल होणार नाही. पुर्ण चौकशी करूनच गुन्हे दाखल होतील. तरी नागरिकांनीही कायदा हातात न घेता कायद्याचा सन्मान करावा. सदर दिंडोरी तालुक्यातील झालेल्या घटनेची पुर्ण चौकशी करून आवश्यक ती कायदेशीर करण्यात येईल असे पोलिस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर यांनी सांगितले.
…
तक्रार मांडली
सर्वसामान्य नागरिकांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना कामकाजाबाबत जाब विचारला तर गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या दिले जातात. काहीवेळा दाखलही होतात हे नक्कीच निंदनीय असून अशा पध्दतीचा आम्ही निषेध करतो. याबाबत विशेष पोलिस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर यांच्याकडे तक्रार मांडली असून यावर ते नक्कीच योग्य निर्णय घेवून न्याय देतील असा विश्वास व्यक्त करतो.
– प्रकाश वडजे, माजी जि.प. उपाध्यक्ष
…..