देवळाली कॅम्प :- नाशिक तालुक्यातील दारणाकाठच्या गावांमध्ये असलेल्या ग्रामपंचायतीसाठी झालेल्या चुरशीच्या लढती झाल्या. वाढलेली मतदानाची टक्केवारी प्रस्थापितांना तारणार की नवोदितांना संधी देणार हे सोमवारी होणाऱ्या मतमोजणी नंतर स्पष्ट होणार आहे. दारणाकाठच्या लोहशिगवे, वंजारवाडी, लहवित, नानेगाव, शेवगे दारणा, बेलतगाव, दोनवाडे या गावांमध्ये सकाळपासून मतदानासाठी उत्साह दिसून आला. गाव पातळीवर निवडणूक असल्याने पक्षापेक्षा,गट, तट, पॅनल, वाडे, भाऊबंदकी यावर मोठा जोर दिसून आला. अनेक नातेवाईक समोरासमोर रिंगणात उतरल्याने विजयासाठी वेगवेगळ्या युक्त्या लढविल्या गेल्या. निवडणूक चुरशीची झाली तरी सर्व ठिकाणी खेळीमेळीचे वातावरण होते.कोणत्याही गावात तणाव दिसून आला नाही. पोलिस उपायुक्त विजय खरात व वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुभाषचंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली देवळाली कॅम्प पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
लोहशिगवे- एकूण जागा ९ बिनविरोध ३ – ६ जागांसाठी १२ उमेदवार १०६५ पैकी ९४४ मतदारांनी मतदान केले.
वंजारवाडी– एकूण जागा ९ जागांसाठी १८ उमेदवार १४३६ पैकी १२८९ मतदारांनी मतदान केले.
दोनवाडे – एकूण जागा ७ जागांसाठी १४ उमेदवार ८४४ पैकी ७९९ मतदारांनी मतदान केले.
नाणेगाव– एकूण जागा ९ पैकी २ जागा बिनविरोध ७ जागांसाठी २१ उमेदवार २६८३ पैकी २४२९ मतदारांनी मतदान केले.
बेलतगव्हाण – एकूण जागा ९ पैकी ३ जागा बिनविरोध ६ जागांसाठी १७ उमेदवार १९८९ पैकी १६४९ मतदारांनी मतदान केले.
शेवगेदारणा– एकूण जागा ९ पैकी २ जागा बिनविरोध -७ जागांसाठी १८ उमेदवार १३०४ पैकी ११२३ मतदारांनी मतदान केले.
लहवित:- एकूण जागा १५ जागांसाठी ३३ उमेदवार ५१४९ पैकी ४२०२ मतदारांनी मतदान केले. याठिकाणी वॉर्ड क्रं ३ मध्ये ईव्हीएम मशीन बंद पडल्याने मतदान प्रक्रिया ७ वाजेपर्यंत सुरु होती. तर बेलतगव्हाण येथेही १ मशीन बंद असल्याचे समजते.