नाशिक – दातार कॅन्सर जेनेटिक्सची कोरोना चाचणी तपासणी प्रयोगशाळा पुढील आदेशापर्यंत प्रयोगशाळा बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिल्यानंतर दातार जेनेटिक्सनेही जिल्हाधिकाऱ्यांवर तब्बल ५०० कोटींच्या मानहानीचा दावा केला आहे. तसेच, याप्रकरणात दोष आढळला नाही तर जिल्हाधिकाऱ्यांनी राजीनामाच द्यावा, असे खुले आव्हान दातार जेनेटिक्सने दिले आहे. त्यामुळे या प्रकरणात जिल्हाधिकारी मांढरे काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत त्यांचा खुलासा केला आहे. तो पुढील प्रमाणे
—
कोरोना काळात प्रशासन तसेच अनेक संस्था, आस्थापना काम करीत आहेत.
कोरोना विषयक कोणतेही मुद्द्याबाबत ज्यावेळेला जनमाणसांमध्ये संभ्रम निर्माण होतो तेव्हा त्या त्या वेळेला त्याचे निराकरण करणे सर्वांचे कर्तव्य आहे.
आपल्या जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून लॅब टेस्टिंग बाबत संभ्रम निर्माण झाल्याची बाब वारंवार समाज माध्यमे, प्रसारमाध्यमे व नागरिक यांच्या कडून उपस्थित होत आहे हे सर्वांनाच ज्ञात आहे. प्रत्यक्षात रुग्ण निगेटिव्ह असताना अहवाल पॉझिटिव्ह दिला गेल्यास त्याचे किती गंभीर परिणाम संबंधित व्यक्तीवर, त्याच्या कुटुंबीयांवर, एकंदरीतच करोना निर्णय प्रक्रियेवर होऊ शकतात हे देखील सर्वांना ज्ञात आहे.
त्यामुळे असा संभ्रम निर्माण झाला तर विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून तो दूर करणे हे आवश्यक आहे.
यापूर्वी देखील अनेक आस्थापनांविरुद्ध राज्यभरात प्रकरण परत्वे त्या-त्या प्राधिकरणामार्फत कार्यवाही करण्यात आलेली आहे.
त्यामुळे प्रमाणित कार्यपद्धतीचा अवलंब होत आहे किंवा कसे याबाबत सक्षम यंत्रणांकडून खातरजमा करणे बाबत आदेश प्रस्तुत प्रकरणात पारित करण्यात आलेले आहेत. जोपर्यंत याबाबत खातरजमा होत नाही तोपर्यंत तपासणी सुरू ठेवणे हे निश्चितच अयोग्य आहे.
शेवटी सर्वच व्यवस्थांची बांधिलकी नागरिकांशी आहे हे विसरता कामा नये. आणि त्याच दृष्टीने हे आदेश पारित करण्यात आले आहेत.
त्यामुळे आदेशातील बाबींवर पूर्तता करून यथोचित उत्तर पाठवले गेल्यास प्रकरणात पुढील यथोचित निर्णय घेणे सुकर होईल.
असे असताना वेगळ्या प्रकारे नोटिसा देणेचे अथवा भूमिका घेणेचे प्रयोजन समजून येत नाही.
– सूरज मांढरे, जिल्हाधिकारी नाशिक