मुंबई – अमेरिकेला निघालेल्या एका कुटुंबाने शताब्दी एक्स्प्रेस उशिरा पोहोचल्याने विमान हुकल्यावर ग्वाल्हेर ग्राहक तक्रार निवारण आयोगात भरपाईसाठी प्रकरण दाखल केले होते. जिल्हा ग्राहक आयोगाने हा दावा फेटाळून लावला आहे. फोरमने म्हटले आहे की धुक्यांमुळे गाडी उशिराने पोहोचली आहे, त्यात कर्मचाऱ्याची किंवा रेल्वे प्रशासनाची चूक नाही. धुक्यांमध्ये गाडी वेगात धावल्यास प्रवाश्यांच्याच जीवाला धोका पोहोचू शकतो, असेही आयोगाने म्हटले आहे.
प्रकाश आणि सीमा शर्मा अमेरिकेत वास्तव्याला आहेत. अमेरिकेला जाण्यासाठी २२ डिसेंबर २०१७ ला पहाटे चार वाजता त्यांचे दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून त्यांचे विमान होते. २१ डिसेंबर २०१७ ला ते ग्वाल्हेरवरून शताब्दी एक्स्प्रेसने दिल्लीच्या दिशेने रवाना झाले. ग्वाल्हेर स्थानकावरच ही गाडी जवळपास पावणेदोन तास उशिराने दाखल झाली होती. त्यानंतर पहाटे तीन वाजता ही गाडी दिल्लीला पोहोचली. त्यामुळे दोघेही विमानतळावर उशिरा पोहोचले आणि अमेरिकेला जाणारे विमान सुटले. तिकीटांचेही पैसेही वाया गेले. दुसरे विमान ७३ हजार रुपयांत विकत घ्यावे लागले. शिवाय हॉटेलमध्ये थांबण्याचा खर्चही २० हजार रुपयांना पडला. काही दिवसांनी दाम्पत्याने ग्राहक आयोगात दावा ठोकण्यात आला आणि रेल्वे प्रशासनाने ३ लाख ४७ हजार रुपयांची भरपाई करावी, अशी विनंती करण्यात आली.
जीव धोक्यात कसा घालणार ?
आयोगाने रेल्वे प्रशासनाला नोटीस पाठवून उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले होते. रेल्वेने उत्तरात सांगितले की, धुक्यांच्या वेळी गाड्या अत्यंत सुरक्षितरित्या पुढे न्याव्या लागतात. गाडी वेगाने धावल्यास प्रवाश्यांचा जीव धोक्यात घालण्यासारखे आहे. डिसेंबरमध्ये धुके खूप होतात. त्यामुळे या तक्रारीवर सुनावणी अशक्य आहे. आयोगाने याचिकाच फेटाळून लावली.