येवला – तालुक्यात मोठ्या प्रमाणात वातावरणीय बदल होत आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून तालुक्याच्या अनेक भागात संध्याकाळी पाऊस, पहाटे दव तर सकाळी दाट धुके पडत असल्याने कांदा लागवडीसाठी तयार असलेले कांदा रोपे सडू लागली आहेत.
तालुक्यात प्रारंभपासूनच समाधानकारक पावसानंतर काही दिवस पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामातील पिके सुकू लागली होती. मात्र, गेल्या दहा-बारा दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. खरीप हंगामातील बाजरी, मका, सोयाबीन, भुईमूग व इतर पिकांना या पावसाचा फायदा झाला आहे. तर गेल्या तीन-चार दिवसांपासून परिसरात पहाटे दवासह दाट धुके पडत असल्याने शेतात कांदा लागवडीसाठी तयार असलेले कांदा रोपे सडत असल्याने शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मागील वर्षी कांद्यास चांगला बाजारभाव मिळाल्याने यंदा शेतकरी वर्गाने मोठ्या प्रमाणात कांदा रोपांची लागवड केली आहे. धुक्यामुळे या रोपांचे नुकसान होत असल्याने शेतकरी वर्गाला मोठा आर्थिक फटका बसत आहे.