मुंबई – दहाव्या राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. राजन गवस यांची निवड झाली आहे. या संमेलनाला राज्यभरातून मराठी साहित्यावर प्रेम करणारे शिक्षक, मान्यवर हजेरी लावतात. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे संमेलन ऑनलाईन पद्धतीने होणार आहे, अशी माहिती शिक्षक साहित्य संमेलन संस्थेचे अध्यक्ष जयवंत पाटील यांनी दिली आहे.
डॉ. राजन गवस हे मराठीतील एक ख्यातनाम लेखक आहेत. त्यांच्या ‘तणकट’ या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार २००१ मध्ये मिळाला आहे. त्यांची ‘चौंडकं’ ही कादंबरीही खूप गाजली आहे. या कादंबरीच्या कथेवर ‘जोगवा’ हा मराठी चित्रपट निघाला. या चित्रपटाला देशातील विविध मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. कादंबऱ्या, कथासंग्रह, कवितासंग्रह, संशोधनग्रंथ,संपादित ग्रंथ असं विपुल लेखन त्यांनी केलेलं आहे. अनेक वर्तमानपत्रातून ते सातत्याने लिहत असतात. शिक्षकी पेशातही त्यांनी अनेक वर्ष कार्य केलेलं आहे. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापिठाच्या मराठी विभाग प्रमुख म्हणून त्यांनी काम केले आहे. लेखक, कवी, शिक्षणावरील अभ्यासक आणि समीक्षक म्हणून ते प्रसिद्ध आहेत. साहित्यातील योगदानाबद्दल अनेक नामवंत पुरस्कारांनी त्यांचा गौरव झालेला आहे. डॉ. राजन गवस यांची राष्ट्र सेवा दलाच्या चळवळीत जडणघडण झालेली आहे.
शिक्षकांच्या साहित्य प्रज्ञेचा शोध घेण्यासाठी त्याचबरोबर भाषा आणि साहित्याचे अध्यापन आशय समृद्धीसाठी आमदार कपिल पाटील यांच्या संकल्पनेतून हे शिक्षक संमेलन सुरु झाले. आजपर्यंत अशी नऊ संमेलनं यापूर्वी मुंबई, ठाणे, बुलढाणा,रत्नागिरी, गोंदिया, विरार येथे मोठ्या दिमाखात पार पडली आहेत. कवयित्री नीरजा, डॉ. सदानंद मोरे, नाटककार शफाअत खान, रमेश इंगळे उत्रादकर, लोकशाहीर संभाजी भगत, प्रविण बांदेकर, जयवंत पाटील, प्रा. वामन केंद्रे, प्रज्ञा दया पवार यांनी यापूर्वीच्या संमेलनाचे अध्यक्षपद भूषवलेले आहे. खासदार शरद पवार, ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, हिंदूकार डॉ. भालचंद्र नेमाडे, ख्यातनाम विचारवंत प्रा. पुष्पा भावे, ज्येष्ठ नाट्यकर्मी सुलभा देशपांडे, नितीन वैद्य, वसंत आबाजी डहाके, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, रंगनाथ पठारे, जावेद अख्तर, निखिल वागळे, फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी यापूर्वीच्या संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली होती.