श्रीनगर – येथील भारतीय लष्कराच्या गस्ती पथकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात यश दिगंबर देशमुख या जवानाला वीरमरण आले आहे. देशमुख हे पिंपळगाव ता. चाळीसगाव, जि. जळगाव येथील रहिवासी आहेत. त्यांचे वय अवघे २२ एवढे होते.
जम्मू-काश्मिरमध्ये गुरुवारी दुपारी दहशतवाद्यांनी भारतीय लष्कराच्या गस्ती पथकावर हल्ला केला. देशमुख हे पॅरा मिल्ट्रीमध्ये भरती झाले होते. गेल्या तीन महिन्यांपासून ते जम्मू काश्मिरमध्ये कार्यरत होते. यश देशमुख यांना वीरमरण आल्याची माहिती पिंपळगाव येथील देशमुख कुटुंबियांना लष्कराच्यावतीने फोनद्वारे देण्यात आली आहे. यश देशमुख यांचे पार्थिव श्रीनगरहून औरंगाबाद मार्गे चाळीसगावला आणले जाणार आहे. लष्करी इतमामात त्यांचा पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. यश यांच्या वीरमरणामुळे पिंपळगावसह संपूर्ण तालुक्यात शोक व्यक्त केला जात आहे. तसेच, सर्व क्षेत्रातून श्रद्धांजली व्यक्त केली जात आहे.