जव्हारचा शाही दसरा अन् तारपा नृत्याच्या स्पर्धा
आदिवासी संस्कृतीचे प्रतिबिंब त्यांच्या प्रत्येक कलाविष्कारात उमटलेले दिसते. चित्र,संगीत, नृत्य, गाणी यांनी वारली जमातीचे जीवन समृद्ध केले आहे. त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण तारपानृत्य उत्स्फूर्त व आकर्षक असते. वारली चित्रशैली जगभरात लोकप्रिय होण्यामागे या देखण्या नृत्याचा व त्याच्या केल्या जाणाऱ्या बहारदार चित्रणाचा मोठा वाटा आहे. तारपानृत्य जास्त देखणे की त्याचे चित्रण अधिक सुंदर असा प्रश्न रसिकांना पडल्यावाचून रहात नाही.
जव्हार संस्थानाचे राजे यशवंत मुकणे पूर्वी दरवर्षी दरबारी शाहीदसऱ्याला तारपा नृत्याच्या स्पर्धा आयोजित करत. तेव्हा रात्रभर तारपा नृत्यात आदिवासी समाज बांधव रंगून जात. भाद्रपदात सुरु होणारे तारपानृत्य पाड्यांवर त्रिपुरीपौर्णिमेपर्यंत रात्ररात्र सुरु रहाते. कालौघात त्यांचे प्रमाण कमी झाले असले तरीही महत्त्व संपलेले नाही.जव्हार संस्थानचे वारसदार महेंद्रसिंग मुकणे पुण्याला असतात मात्र ते दरवर्षी दसरा उत्सवासाठी जव्हारला आवर्जून येतात. आता वेगवेगळ्या संस्था तारपा नृत्याच्या स्पर्धा घेतात. यंदा मात्र कोरोनामुळे त्यात खंड पडेल. वारली चित्रशैलीला समृद्ध अशी ११०० वर्षांची प्रदीर्घ परंपरा लाभलेली आहे.
ठाणे जिल्ह्यापासून गुजरातच्या सीमारेषेपर्यंत ही जमात पसरलेली आहे.वारली लोक शेतांजवळ झोपड्या बांधून रहातात.पंधरावीस झोपड्यांच्या या वस्तीला पाडा म्हणतात. असे जवळपास असंख्य पाडे असतात.या पाड्यांवर निसर्गाच्या सानिध्यात स्वच्छंदी जीवन ते जगतात. दारिद्र्य, दैन्य,दुःख,उपेक्षा, अज्ञान त्यांच्या वाट्याला आलेले असते. मात्र त्यावर मात करण्याचे बळ त्यांना कलेतूनच मिळते.
चित्र, संगीत, नृत्य त्यांच्या जीवनाचे अविभाज्य अंग आहे. या कलांमध्ये रममाण होऊन वारली जमात आनंदात जीवन जगते. या कलांमधून ते आनंद मिळवतातच पण तो रसिकांनाही भरभरून देतात. तारपानृत्याचे चित्र नीट बघितले तर त्यात पूर्ण वर्तुळ व माणसांच्या संपूर्ण आकृती दिसतात. म्हणजेच त्यांनी अत्यंत विचारपूर्वक टॉप अँगल आणि साईड इलेव्हेशन यांची कलात्मक सांगड घातलेली दिसते. वारली चित्रांमध्ये एक स्वतंत्र पर्सपेक्टिव्ह बघायला मिळतो. म्हणूनच तारपानृत्य व त्याचे चित्रण हा जगभरातील कलाप्रेमींच्या कुतूहलाचा, औत्सुक्याचा आणि कौतुकाचा विषय आहे.
दुर्गम भागात राहणारी वारली जमात निसर्गाच्या सानिध्यात स्वच्छंदी जीवन ते जगतात. दारिद्र्य, दैन्य,दुःख,उपेक्षा, अज्ञान त्यांच्या वाट्याला आलेले असते. मात्र त्यावर मात करण्याचे बळ त्यांना कलेतूनच मिळते. चित्र, संगीत, नृत्य त्यांच्या जीवनाचे अविभाज्य अंग आहे. या कलांमध्ये रममाण होऊन वारली जमात आनंदात जीवन जगते. या कलांमधून ते आनंद मिळवतातच पण तो रसिकांनाही भरभरून देतात.
दुर्गम भागात राहणारी वारली जमात निसर्गाच्या सानिध्यात रममाण झालेली दिसते. त्यांचे देव, लोकगीते, नृत्ये, चित्रे आणि जीवनशैली यामध्ये सभोवतालच्या समृद्ध निसर्गाचा खोलवर ठसा उमटलेला असतो. निसर्गातून मिळणाऱ्या साधनसामग्रीचा ते कौशल्याने कलात्मक वापर करतात. विविध साधने, उपयुक्त वस्तू आणि आकर्षक कलाकृती निर्माण करतात. त्यातून त्यांच्या जीवनात आनंदाचा झरा झुळझुळ वाहत असतो.
सामुदायिक नृत्याला त्यांच्या आयुष्यात सर्वोच्च स्थान आहे.तारपानृत्य हा त्यातला सर्वात लोकप्रिय प्रकार ! त्यामध्ये स्त्री पुरुष मोकळेपणाने सहभागी होतात. वर्तुळाकारात होणाऱ्या तारपानृत्याचा प्रारंभ दहा- वीस स्त्री पुरुष करतात. बघताबघता त्यात १०० पेक्षा जास्त जणांना सामावून घेतले जाते. भाद्रपदात हळव्या जातीचे भात पिकू लागते. तो आनंद नाचगाण्यातून व्यक्त होतो.
रात्रीच्या शांत वेळी पाड्यापाड्यावरून तारप्याची मधुर सुरावट उमटू लागते. त्या सुरावटीवर तरुणांपासून वृद्धांपर्यंत अनेकजण उत्स्फूर्तपणे नृत्य करतात. मध्यभागी तारपा वाजविणारा असतो.त्याच्या सभोवताली सर्वजण हातातहात धरून फेर धरतात. नाचणाऱ्या वर्तुळातील पहिल्या तरुणाच्या हातात घुंगरू लावलेली काठी असते. तो समूहाचे नेतृत्व करून वर्तुळाची दिशा बदलण्याचे व हातापायांच्या हालचाली बदलण्याची भूमिका बजावतो. हातात हात गुंफून किंवा परस्परांच्या खांद्यावर, कमरेवर हात ठेवून लयबद्ध पदन्यास रंगतो. हे नृत्य बघणे विलोभनीय असते. तेव्हढेच या नृत्याचे केले जाणारे चित्रण बहारदार ठरते.
तारपानृत्याला गाण्यांची जोड नसते.घुंगरांचा नाद आणि टाळ्यांचा ताल यांची तारप्याच्या सुरावटीला साथ असते. साथीला ढोल देखिल वाजवला जातो. तारप्याचे सूर ऐकले की सर्वांच्या पायांना स्फुरण चढते. लयतालाशी मैत्री करतांना नृत्य करणाऱ्यांचे भान हरपते. बघणाऱ्यांंनाही त्यात सामील होऊन निरागस आनंद लुटण्याची नकळत इच्छा होते. काहींना या नृत्याचा आकार चकलीसारखा वाटतो.
सर्पाकृती किंवा स्पायरल आकारात होणारे तारपानृत्य तासनतास सुरु राहते. ते बघून कलाप्रेमी रसिक अक्षरशः मंत्रमुग्ध होऊन जातात.जव्हार येथे दसऱ्याच्या पूर्वसंध्येला तारपा नृत्यांची स्पर्धा होते. लांबलांबून तारपानृत्य करणारे आदिवासी गट दाखल होतात. रात्रभर एकापाठोपाठ एक बहारदार नृत्ये रंगतात.तो माहोल अनुभवणे खूपच धम्माल असते. पितृबारशाच्या दिवशी महालक्ष्मीगड येथे यात्रा भरते. तेंव्हा हजारो आदिवासी नृत्यात रमतात. वारली जमातीत तारपा नृत्याप्रमाणेच इतर नृत्येही केली जातात.
कामडनाच,ढोलनाच,धुमस्यानाच, घोरनृत्य, गौरी सणाची गाणी व नाच यासह वेगवेगळ्या देवतांचे नाच केले जातात. ढोलनाच अतिशय जलद, वेगवान असतो. तो फक्त पुरुषच करतात. होळीचा सणही तारपानृत्यांनी महिनाभर गजबजतो.पद्मश्री जिव्या सोमा मशे यांनी रंगविलेली तारपा नृत्याची चित्रे अतिशय गाजली आहेत. दुसरीकडे तारपावादकांची नवी पिढी पुढे येत नसल्यामुळे आदिवासी वारली जमातीचे हे डौलदार नृत्य नामशेष होईल की काय अशी शंका उपस्थित होते.
वारली चित्रसंस्कृतीचे सुरेल प्रतिक – तारपा !
तारपा हे वाद्य वाजवून त्याच्या एकसंध लयीवर केलेल्या नृत्याला तारपानृत्य म्हणतात. दुधीभोपळा वाळवून, कोरून तारपा हे सुशिर वाद्य तयार केले जाते. लांबट आकाराच्या पूर्ण पिकलेल्या भोपळ्याच्या आतील गर, बिया काढून टाकण्यात येतो. तो वाळल्यावर वरचे कवच पूर्णपणे स्वच्छ करतात. आतील बाजूला बांबूच्या दोन नळ्या बसवतात. या नळ्यांवर निरनिराळे सूर काढण्यासाठी ठराविक अंतरावर छिद्रे पडलेली असतात. त्यात तोंडाने हवा फुंकली की सूर उमटतात. पुढील बाजूला ताडाच्या पानांपासून बनविलेला कर्णा कोतीचे मेण लावून पक्का करतात. त्यामुळे आवाज मोठा येतो व दूरवर पोहोचतो.तारप्याला विशिष्ट सुंदर आकार येतो.तारप्याच्या भोपळ्यावर काहीवेळा सुरेख वारली चित्रे काढलेली दिसतात.
तुतारीपेक्षा कमी बाक असणारे हे वाद्य दिसायलाही देखणे आहे. हे वाद्य तयार करणे कौशल्याचे काम असून ते वाजविणे ही वेगळी कला आहे.लहान आकाराच्या या वाद्याला तारपी, मध्यम आकाराच्या तारप्याला घोग्रा असेही म्हणतात. ६ फूट लांबीच्या तारप्याला खोंगाडा म्हटले जाते. हे वाद्य वाजविण्यासाठी श्वासावर अतिशय नियंत्रण लागते. नाभीपासून हवा फुंकावी लागते. कुशल तारपावादक तासनतास सलग तारपावादन करतात. तारपानृत्याचे नेतृत्व तारपावादकच करीत असतो. तारप्याच्या सुरावटीनुसार नृत्याची लय बदलते. पूर्वी आदिवासी वारली पाड्यांवर मोकळ्या जागेत सायंकाळी तारपा नृत्य सुरु होई. रात्रभर नाचून सकाळी सूर्योदयानंतर ते थांबत असत. त्यामुळेच तारपानृत्याच्या चित्रात सूर्य व चंद्र यांची रेखाटने केलेली दिसतात. तारप्याच्या सुरावटीला तालाची संगत करण्यासाठी जोशपूर्ण ढोल वाजविला जातो. सूर, ताल आणि लय साधत तारपा नृत्य करतांना सर्वजण ठेका धरून तल्लीन होतात. देहभान विसरून आनंद मिळवतात.