केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अर्जुन पुरस्कारांमध्ये रोइंग पटू दत्तू भोकनळ, महिला खो खो संघाची कर्णधार सारिका काळे, कुस्तीपटू राहुल आवारे या महाराष्ट्रीयन खेळाडूंचा समावेश आहे. भोकनळ हा रोइंग मधून देशाचे प्रतिनिधित्व करत असून त्याने ऑलिंपिक स्पर्धेमध्ये भारताला मोठे यश मिळवून दिले होते. सातत्याने देशाचे प्रतिनिधित्व करताना त्याने अभिमानास्पद कामगिरी केली आहे. मंगळापूर येथील अत्यंत गरिब कुटुंबातील दत्तु भोकनळ याने गरिबीचे मोठे चटके सोसले. विहीरीचे खोदकाम केले. त्याची भारतीय सैन्यात निवड झाल्यावर त्याने रोईंग खेळावर लक्ष केंद्रीत करुन आशियाई क्रिडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून ध्येय गाठले. आज त्याच्यामुळे अनेक जण रोईंगचे चाहते झाले.
—
नाशिकचे सुपुत्र दत्तू भोकनळ यांना राष्ट्रीय पातळीवरील क्रीडा प्रकारातील मानाचा असा ‘अर्जुन पुरस्कार’ आज घोषित झाला. त्याचे राज्य शासनाच्या वतीने अभिनंदन. दत्तूचा अर्जुन पुरस्कारापर्यंतचा प्रवास अतिशय संघर्षमय असा आहे. मोलमजुरी करत शिक्षण घेतले. पुढे सैन्यात दाखल होऊन तिथे रोइंग शिकला आणि त्यानंतर ऑलिम्पिक असो, आशियाई क्रीडा स्पर्धा असो किंवा इतर आंतरदेशीय स्पर्धांमध्ये देशाचे नाव उंचावले आहे. रिओ ऑलम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व, आशियाई स्पर्धेतील सांघिक प्रकारात सुवर्ण असा त्याचा हा आलेख उंचावणारा आहे. यातून नवखेळाडूंना नक्कीच यातून प्रेरणा मिळेल. नाशिकच्याच नव्हे तर राज्याच्या शिरपेचात हा मानाचा तुरा यानिमित्ताने रोवला गेला आहे.
– छगन भुजबळ, पालकमंत्री, नाशिक