अमरावती – आंध्र प्रदेश राज्य निवडणूक आयोगाने ग्रामविकास राज्यमंत्री पी. रामचंद्र रेड्डी यांना २१ फेब्रुवारीपर्यंत ‘नजरकैदेत’ ठेवण्याचे आदेश पोलिस महासंचालकांना दिले आहेत. त्यामुळे रेड्डी हे घराच्या परिसरातून बाहेर जाऊ शकणार नाहीत. आयोगाविरोधात कथित भाष्य करण्याच्या प्रकरणात त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
आंध्र प्रदेशात ९ ते २१ फेब्रुवारीदरम्यान चार टप्प्यात पंचायत निवडणुका होणार आहेत. दरम्यान राज्य निवडणूक आयुक्त रमेश कुमार यांनी आपल्या आदेशात असे म्हटले आहे की, आयोग विविध पर्यायी उपायांचा विचार करून पंचायती राज व ग्रामविकास मंत्री यांना २१ फेब्रुवारी पर्यंत म्हणजे ग्रामपंचायतींची निवडणूक पूर्ण होईपर्यंत त्यांच्या घराच्या आवारात ठेवावे.
तथापि, घराच्या बाहेर जाण्यास बंदी घालणारा हा आदेश वैद्यकीय गरजा किंवा अपरिहार्य अशा परिस्थितीत लागू होणार नाही. परंतु त्या काळात ते माध्यमांशी किंवा राजकीय समर्थकांशी बोलू शकणार नाहीत. निवडणूक अधिकाऱ्यांना धमकावल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यांनी पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकाऱ्यांना धमकी दिली की, त्यांनी ‘निंदनीय निवडणूक आयुक्त’ यांच्या सूचनांचे पालन करू नये. तसेच पोलिस महासंचालकांना आयोगाच्या आदेशाची अंमलबजावणी करायची असेल तर ते तसे करु शकतात, असेही ते म्हणाले.