वैदिक गणिताचे आधुनिक प्रवर्तक – आचार्य भारती कृष्ण तीर्थ महाराज
आद्य शंकराचार्य यांनी भारतामध्ये चारही दिशांना मठांची स्थापन केली त्यापैकी पूर्वेस गोवर्धन पिठ आहे. त्याचे 143 शंकराचार्य होते पूजनीय भारती कृष्ण तीर्थ महाराज. ते दर्शनशास्त्र, तत्त्वज्ञान, धर्मशास्त्र, वेदांत या विषयांचे मार्गदर्शक होतेच, निष्णात वकील होते आणि प्राचीन भारतीय गणित विषयाचे( म्हणजेच वैदिक गणिताचे )आधुनिक प्रवर्तक होते.
त्यांचा जन्म चैत्र शुक्ल तृतीयेला शके १८०६ मध्ये (म्हणजेच १४ मार्च १८८४ ) रोजी तामिळनाडू राज्यातील थिनेवल्ली येथे झाला. त्यांचे नाव वेंकटरमण ठेवण्यात आले होते. त्यांचे कुटुंबीय अतिशय धार्मिक होते. यांच्या वडिलांचे नाव नरहरी शास्त्री होय. घरची पिढीजात शेतीवाडी होती. मातृवंशही अत्यंत सुसंस्कृत. घरचे सर्व व्यवहार संस्कृत भाषेतून चालत होते. त्यामुळे त्यांची आणि त्यांच्या घराण्याची मातृभाषा संस्कृत होती. व्यंकटरमण यांचे बालपणी जेव्हा भविष्य पाहिले गेले तेव्हा एका ज्योतिषशास्त्रीने हा व्यंकटरमण पुढील आयुष्यात परिव्राजक होणार असे भाकीत केले होते.
वयाच्या १४ व्या वर्षी म्हणजे सन १८९८ मध्ये त्यांनी हायस्कूलमधून संस्कृत, गणित, इंग्रजी, विज्ञान आणि इतिहास या विषयांमध्ये विशेष प्रावीण्य संपादित करून मॅट्रिकच्या परीक्षा दिली. सर्व विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करून घेऊन ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. महाविद्यालय शिक्षणासाठी शास्त्री यांनी मद्रास ख्रिश्चन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. सन १९०० मध्ये इंटरचा अभ्यास करत असताना ऐन परिक्षेच्या वेळी त्यांच्या वडिलांचे देहावसान झाले. तरीही त्यांनी भावनाप्रधान न होता विद्यार्थी धर्म अनुसरला आणि विद्यापीठात प्रथम क्रमांक प्राप्त केला.
१९०१ मध्ये चेन्नईमध्ये अखिल भारतीय विद्वत परिषद झाली होती. या परीक्षेचे या परिषदेचे अध्यक्ष एम. वेंकटरमन शास्त्री होते. ते एक महान पंडित होते. त्यावेळी ख्रिश्चन कॉलेजचे प्राचार्य चंद्रचुंक यांनी आपल्या कॉलेजमधील विद्यार्थी वेंकटरमण नरहरी शास्त्री याला त्या परिषदेत पाठवले. प्रचार्यांचा विश्वास त्यांनी सार्थ ठरवला. त्यांच्या व्याख्यानाचा प्रभाव संमेलन अध्यक्षांवर इतका पडला की त्यांनी या विद्यार्थ्याला संमेलनातच ‘डॉक्टर रमण सरस्वती ‘ ही सन्मानार्थ पदवी प्रदान केली. बी. ए. होण्यापूर्वीच ते डॉक्टर रमण सरस्वती या नावाने ओळखले जाऊ लागले. सन १९०२ मध्ये ते बी. ए. ची परीक्षा ही प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले.
सन १९०४ मध्ये डॉक्टर रमण सरस्वती यांनी अमेरिकन कॉलेज ऑफ सायन्स, (मॅनचेस्टर,) न्यूयार्क या विद्यापीठाची एम.ए. ची परीक्षा दिली. या परीक्षेसाठी त्यांनी एकाच वेळी संस्कृत, तत्त्वज्ञान, इंग्रजी, गणित, इतिहास आणि विज्ञान हे विषय निवडले होते. या सर्व विषयात त्यांना अत्युच्च गुण मिळाले आणि तो जागतिक उच्चांक अद्यापही आबाधित आहे.
इसवी सन १९०५ मध्ये डॉक्टर रमण सरस्वती यांनी स्वतःला ‘ राष्ट्रीय शैक्षणिक चळवळ आणि भारतीयांच्या समस्या ‘ या कार्याला वाहून घेतले. ही चळवळ महात्मा गांधींना गुरुस्थानी असणाऱ्या प्राध्यापक गोपाळकृष्ण गोखले यांनी सुरू केली होती. त्यावेळी गोखले हे पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये इंग्रजीचे प्राध्यापक होते. गोपाळ कृष्ण गोखले आणि योगी अरविंद यांच्या सहवासामुळे ते भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातही सहभागी झाले होते.सन १९०६ मध्ये कलकत्ता येथे झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनातही त्यांचा सहभाग होता. थोर भारतीय विभूती लाला लजपत राय यांच्या अटकेच्या विरोधात त्यांनी ठराव मांडला होता. १९०८ मध्ये डॉक्टर ॲनी बेझंट यांनी डॉक्टर रमण सरस्वती यांची नियुक्ती ‘ वॉर्डन सन ऑफ इंडिया ‘ या पदावर केली.
डॉक्टर रमण सरस्वती यांनी काही काळ योगी अरविंद यांच्या विनंतीनुसार बडोदा आणि लाहोर येथे अध्यापन कार्य केले. त्यानंतर त्यांनी राजमहेंद्री येथील एका महाविद्यालयाच्या प्राचार्य पदाची धुरा सांभाळली. ते प्राचार्य पदावर असताना एका शैक्षणिक संघटनेचे अध्यक्ष होते. त्यावेळी पट्टाभी सीतारामय्या हे स्वातंत्र्य चळवळीच्या तामिळनाडू प्रांताच्या अध्यक्षस्थानी होते आणि सचिवपदी होते डॉक्टर रमण सरस्वती.
त्यांना अध्यात्म साधनेची खूप ओढ होती. म्हणून ते सन १९११ मध्ये शृंगेरी मठात आले. त्यावेळी पूजनीय सच्चिदानंद शिवाभिनव नृसिंह भारतीजी महाराज शृंगेरी पिठाचे आचार्य होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली वेंकटरमण शास्त्री (म्हणजेच रमण सरस्वती )यांनी वेद, वेदांगे आणि धर्मशास्त्र यांच्या अभ्यासाची सुरुवात केली. चिकमंगळूर जिल्ह्यातील शृंगेरी या वनात त्यांनी आठ वर्षे म्हणजे १९११ ते १९१८ पर्यंत कठोर तपश्चर्या केली.
डॉक्टर रमण सरस्वती हे त्यांच्या गुरूंच्या अपेक्षांना पात्र ठरले आणि सन १९१९ मध्ये पूजनीय शिवाभिनव नृसिंह भारतीजी महाराज यांनी त्यांना संन्यास ग्रहणाची अनुज्ञा दिली. त्यांचे नाव भारती कृष्ण तीर्थजी महाराज झाले. या नावाने ते जगाला परिचित झाले.
संन्यास ग्रहण केल्यानंतर भारती कृष्णतीर्थजी महाराज यांनी दोन वर्षे धर्मप्रचारक म्हणून पर्यटन केले. तसेच पारतंत्र्याच्या काळात स्वातंत्र्य बद्दलची जागृती निर्माण करण्याचेही काम केले. हे ही एक धर्म कार्यच आहे असे त्यांनी प्रतिपादन केले. एकोणीशे वीस मध्ये त्यांनी इंडियन नॅशनल काँग्रेसच्या नागपूर येथील अधिवेशनात आपला सहभाग नोंदवला.
सन १९२५ मध्ये जगन्नाथ पुरीच्या गोवर्धन पिठावर शंकराचार्य म्हणून त्यांचा अभिषेक झाला. नागपूरचे भौगोलिक महत्त्व लक्षात घेऊन भारती कृष्ण तीर्थ महाराजांनी नागपूर मध्ये ‘ विश्व पुनर्निर्माण संघ ‘ नावाची संघटना स्थापन केली.
अमेरिकन सरकारच्या भारतातल्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने भारती कृष्ण तीर्थ यांची प्राचीन भारतीय गणित ( वैदिक गणित) या विषयावरची व्याख्याने ऐकली आणि प्रत्यक्ष अनुभवली. त्यांनी भारतीय दूतावासाची संपर्क करून भारती कृष्ण तीर्थ यांना अमेरिकेत गणितावरील व्याख्यानांसाठी आमंत्रित केले. त्यानंतर त्यांना अनेक पाश्चात्य देशांमध्ये प्राचीन भारतीय गणितावरील व्याख्यानासाठी आमंत्रित केले होते. या काळात त्यांनी रेडिओ आणि दूरदर्शनवरील ही भरपूर मुलाखती व व्याख्याने दिली. अमेरिकेहून परतल्यानंतर प्रकृती हळूहळू बिघडत गेल्याने २ फेब्रुवारी १९६० रोजी मुंबईला वसंत पंचमीच्या दिवशी बाबासाहेब घटाटे यांच्या सूर्यप्रभा भवनात त्यांचे देहावसान झाले.
त्यांनी प्राचीन भारतीय गणिता बाबत भरपूर संशोधन केले आणि व्याख्याने दिली. तसेच लेखनही केले होते. त्यांच्या निधनानंतर सुमारे पाच वर्षांनी त्यांच्या लेखांचे आणि टिपन्यांचे संपादन करून डॉक्टर अग्रवाल यांनी एक ग्रंथ संपादित केला. तो ग्रंथ दिल्लीच्या मोतीलाल बनारसीदास प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेने सन १९६५ मध्ये ‘ वैदिक गणित ‘ या नावाने प्रकाशित केला. आणि तेव्हापासून प्राचीन भारतीय गणित परंपरेला वैदिक गणित असे संबोधण्यात येऊ लागले. या ग्रंथात १६ सूत्रे आणि १३ उपसूत्रे आहेत.
—
आवाहन
(गणित कोडे किंवा गणितासंदर्भातील आपल्या काही शंका असतील तर त्या आपण 9822061228 या क्रमांकावर व्हॉटसअॅप करु शकता. या शंकांचे निरसन दर शनिवारी केले जाईल)
—
वाचत रहा
सोमवार ते शुक्रवार – गणित कोडे
शनिवारी – शंका-समाधान आणि गणितातील रंजक माहिती
रविवारी – ओळख भारतीय गणिततज्ज्ञांची
—