भास्कराचार्य (प्रथम)
भारताने जगालाच थोर गणिती दिले आहेत. त्यांची ओळख करुन देणारे हे सदर दर रविवारी. आजच्या भागात भास्कराचार्य प्रथम यांच्या जीवनकार्याविषयी….
भास्कराचार्य (प्रथम) यांचा कालखंड इ.स.वी. सन ६०० ते ६८० हा आहे. भास्कराचार्य (प्रथम) यांचा जन्म सौराष्ट्रात झाला असला तरी ते नंतर आंध्रप्रदेशातील निझामाबाद येथे गेले होते. दशांश चिन्हाचा वापर करणे व शून्याला पोकळ वर्तुळाकार रूपात लिहिणे ही महत्त्वाची गोष्ट भास्कराचार्य (प्रथम) यांनी केली. भास्कराचार्यांनी आर्यभटाच्या आर्यभटीय पुस्तकावर भाष्य लिहिण्याचे काम केले आहे. त्यांनी संस्कृत भाषेमध्ये लघुभास्करीय आणि महाभास्करीय हे दोन ग्रंथ लिहिले आहेत. त्यांचे वडील हेच त्यांचे गुरु होते. निजामाबाद जिल्ह्यातील काही गणितज्ज्ञांनी मिळून एका गुरूकुलाची निर्मिती केली होती. गुरुकुलामध्ये आर्यभटीय ग्रंथांचा सखोल अभ्यास केला जात असे.
भास्कराचार्य (प्रथम) यांनी लिहिलेला महाभास्करीय ग्रंथ हा एकूण आठ प्रकरणांचा आहे. ती प्रकरणे पुढील प्रमाणे,(१) ग्रहांचे अंतर (२) ग्रहांचा एकमेकांवर असलेला प्रभाव (३) ग्रहांचे तार्यांशी असलेले संबंध (४) चंद्राची कक्षा (५) सूर्याची कक्षा (६) सूर्योदय व सूर्यास्त (७) चंद्रोदय चंद्राच्या वाढत जाणाऱ्या आणि कमी होत जाणाऱ्या कला (८) त्रिकोणमिती. भास्कराचार्य (प्रथम) यांच्या ग्रंथात त्रिकोणमितीतील साईन (sine) या गुणोत्तराचा उपयोग सांगितलेला आहे. [sin 30° = 0.5, sin 45° = 0.705, sin 60° = 0.865 या किमती आजही अचुकतेला जवळच्या आहेत]
भास्कराचार्य (प्रथम) यांच्या ग्रंथाचा महत्त्वाचा विभाग म्हणजे आर्यभटीय ग्रंथावर केलेले भाष्य होय. या ग्रंथात अनेक गणिती सूत्रे, तर्क आणि विज्ञान यावर सखोल मत प्रदर्शन केलेले आहे. तसेच आर्यभटीय या ग्रंथातील काही त्रुटी शोधून त्यांची पूर्तता आणि स्पष्टीकरणे भास्कराचार्य (प्रथम) यांनी आपल्या आर्यभटीय भाष्य या ग्रंथात दिलेली आहेत. काही ठिकाणीची सूत्रे त्यांनी स्वतःचं नव्याने तयार केलेली आहेत.
भास्कराचार्य (प्रथम) यांच्या गणित लेखनाची समीक्षा गोविंदस्वामी (८०० ते ८५०), शंकर नारायण (८२५ ते ९००) आणि उदय दिवाकरन (अकरावे शतक) यांनी केलेली आहे. आज जवळपास साडे पंधराशे वर्षांनंतरही या ग्रंथांचा उपयोग होत आहे. आर्यभटीय भाष्य आणि महाभास्करीय हे दोन्ही ग्रंथ टिकूनही आहेत. ते संदर्भग्रंथ म्हणून वापरलेही जात आहेत. कनौज येथील पृथक स्वामी यांच्या ब्रह्मगुप्ता वरील पुस्तकांमध्ये भास्कराचार्य (प्रथम) यांचा संशोधनाचा उल्लेख आढळून येतो. केरळ प्रांतांत आजही भास्कराचार्य (प्रथम) यांच्या गणिती संशोधनाचा फार मोठा प्रभाव आढळून येतो. त्यांच्या ग्रंथात त्रिकोण, समांतरभुज चौकोन यांचे गुणधर्म या महत्त्वाच्या संकल्पनांचा उल्लेख आहे. गणितीय आकृत्या, समीकरणांचे विविध प्रकार आणि त्यांच्या उकली, वर्ग समीकरणे, विविध वजने-मापे, तसेच संकेत चिन्हे अशा काही अंकगणितातील संकल्पना आढळून येतात. महाभास्करीय आणि आर्यभटीय या दोन्ही ग्रंथांचे अरबी भाषेमध्ये भाषांतर झालेले आहे. काही अंकांसाठी शब्दांचा उपयोगही भास्कराचार्य (प्रथम) यांनी केलेला आहे. देवगिरी येथील यादव सम्राट सिंघनदेव यांनी भास्कराचार्य (प्रथम) यांच्या कार्यावर आधारित एका विद्यालयाची स्थापना देवगिरी येथे केलेली होती.
—
(गणित कोडे किंवा गणितासंदर्भातील आपल्या काही शंका असतील तर त्या आपण 9822061228 या क्रमांकावर व्हॉटसअॅप करु शकता. या शंकांचे निरसन दर शनिवारी केले जाईल)
—
वाचत रहा
सोमवार ते शुक्रवार – गणित कोडे
शनिवारी – शंका-समाधान आणि गणितातील रंजक माहिती
रविवारी – ओळख भारतीय गणिततज्ज्ञांची
—