मानवी गणकयंत्र – श्रीमती शकुंतला देवी
डोंबाऱ्याचा खेळ करणारी आणि कुठलेही शिक्षण न घेता गणिततज्ज्ञ झालेल्या शकुंतला देवी यांचे नाव गिनीज बुकात नोंदले गेले आहे. त्यांचे गणित क्षेत्राला मोठे योगदान आहे.
दिलीप गोटखिंडीकर
बंगळुरुच्या एका रस्त्यावर एक खेळ चालला होता. रस्त्यावर दोन लाकडी फांद्यांच्या टोकाला एक दोरी बांधली होती. दोरीचे दुसरे टोक दुसऱ्या बाजूच्या दोन लाकडी फांद्यांच्या टोकाला बांधले होते. या डोंबाऱ्याच्या खेळात एक तरुण दोरीवरून चालण्याचा खेळ करून दाखवत होता. त्या दोरीच्या आधाराच्या जवळ जमिनीवर एक पाच-सहा वर्षाची मुलगी फतकल मारून बसली होती. ती छोट्या कामट्यांच्या साह्याने ढोलकी पिटत होती. आकस्मिकपणे दोरीवरून चालणाऱ्या तरुणाचा तोल गेला आणि तो तरुण रस्त्यावर कोसळला.
मुलीने ते दृश्य पाहिले आणि ती हबकूनच गेली. आधीची रात्र आणि सकाळपासून तिच्या पोटात अन्नाचा कणही गेला नव्हता. तिला चिंता पडली होती ती म्हणजे आजचा खेळ पूर्ण झाला नाही तर पैसे मिळणार नाहीत, उपास घडणार आणि वडिलांना झालेल्या दुखापतीवर उपचार कसा करणार? तिने ढोलकी वाजवणे तात्काळ थांबवले आणि प्रसंगावधान राखून वर्तुळाकार उभ्या असणाऱ्या गर्दीला सांगितले की, “मी तुम्हाला एक जादू करून दाखवते” तिने पोतडीतून एक पत्त्यांचा संच काढला. ते पत्ते विशिष्ट पद्धतीने पिसले आणि प्रेक्षकांमधल्या काही जणांना एक-एक पत्ता दिला. थोड्याच वेळात तिने प्रत्येकाच्या हातातला पत्ता ओळखला आणि सगळी गर्दी आश्चर्यचकित झाली. सहानभूती म्हणून काही जणांनी तिच्या हातावर चवली-पावली-अधेली ठेवली. त्या आर्थिक मदतीने ते दोघे जेवण करू शकले आणि वैद्यकीय इलाजही करू शकले.
या प्रसंगातील बालिकेचे नाव शकुंतला देवी होय. अतिशय अल्पवयात प्रसंगावधान राखून कुटुंबाचा आधार बनवणाऱ्या त्या मुलीने अल्पकाळातच आपले गणन कौशल्य स्वयम्-अध्ययनाने आणि वडिलांच्या मार्गदर्शनाने विकसित केलेले होते. घरच्या परिस्थितीमुळे आणि वारंवार कराव्या लागणाऱ्या स्थलांतरामुळे औपचारिक शालेय शिक्षण घेता आले नाही. तरी सरावाने आणि वैदिक गणिताच्या अध्ययनाने स्वतःचे गणन कौशल्य खूपच विकसित करून घेतले होते. एकदा तर तिने आकडेमोड करण्याच्या स्पर्धेत संगणकाला ही मागे टाकले होते आणि स्वतःचे नाव ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस’ मध्ये प्रकाशित होण्याइतकी कामगिरी केली.
या महान मानवी गणकयंत्र असणाऱ्या शकुंतला देवी यांचा जन्म ४ नोव्हेंबर १९२९ रोजी एका कानडी कुटुंबात झाला. त्यांचे वडील सुरुवातीला एका सर्कस मध्ये विविध कसरतीची कामे करत असत. बालवयात शकुंतला देवी देखील वडिलांच्या बरोबर सर्कशीच्या कार्यक्रमाला जात असे. तिला वडिलांच्या मार्गदर्शनातून आकडेमोडीची कला प्राप्त झालेली होती असे तिने आपल्या आत्मचरित्रात लिहून ठेवलेले आहे.
शकुंतला देवी कोणतेही औपचारिक शिक्षण प्राप्त झालेले नसले तरी वयाच्या आठव्या वर्षी एक प्रज्ञावान बालिका म्हणून त्या लोकांसमोर आल्या. त्यांना झटपट आणि अचूक अकडेमोडीची दैवी देणगी प्राप्त झालेली होती. सन १९४४ मध्ये त्यांना वडिलांबरोबर लंडनला जाण्याची संधी मिळाली. त्यांनी १९५० पर्यंत युरोपातील विविध देशांमध्ये प्रवास केला. तेथे त्यांनी पाश्चिमात्य गणित प्रेमींना आपल्या गणन कौशल्याने आणि स्मरणशक्तीने मंत्रमुग्ध केले. त्यांचे कार्यक्रम आयोजित करणे आणि गणन कौशल्य जाणून घेणे हा तेथील गणित प्रेमींच्या एक आवडता कार्यक्रम होता. त्यांना शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठातूनही आमंत्रण येत असत. ही एक खरोखरच आश्चर्य करण्यासारखी बाब आहे.
२७ डिसेंबर १९७३ रोजी ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कार्पोरेशन (BBC)च्या एका प्रसारण कार्यक्रमात बॉब वेग्लिस यांच्याबरोबर तिने एक गणित कार्यक्रम केला. या कार्यक्रमात तिने अतिशय कठीण गणिती आकडेमोडीच्या प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन सर्वांनाच आश्चर्यचकित केले. सन १९७७ मध्ये मेंथादिष्ट विद्यापीठात त्यांनी एक कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमात एका दोनशे अंकी संख्येचे वर्गमूळ त्यांनी केवळ ५० सेकंदात सांगितले. संगणकाला मात्र या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी ६२ सेकंद लागली होती. दिनांक १७ जून १९८० रोजी कम्प्युटर डिपार्टमेंट, लंडन येथे दोन संख्यांचा गुणाकार त्यांनी केवळ २८ सेकंदात सांगितला. ते उदाहरण पुढील प्रमाणे
7686369774870 × 46509974507798=?
त्यामुळे त्यांच्या गणन कौशल्याची नोंद गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्डस मध्ये करण्यात आली.
सन १९८८ मध्ये शकुंतला देवी यांची प्रख्यात विद्वान व मानसोपचार तज्ञ प्राध्यापक ऑर्थर जेन्सन यांच्याशी भेट झाली. प्राध्यापक जेन्सन यांनी शकुंतला देवींची परीक्षा घेण्यासाठी त्यांना वेगवेगळी उदाहरणे दिली. काही संख्यांचे सप्तम मूळ काढावयास सांगितले. त्यांच्या सर्व उदाहरणांची उत्तरे अत्यंत अल्पावधीत अचूकतेने सांगितल्यामुळे प्राध्यापक जेन्सन यांनी त्या सगळ्या आकडेमोडीची नोंद Academic general Intelligence मध्ये प्रकाशित केली आहेत.
शकुंतला देवी यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले. त्यापैकी फिलिपाईन्स विद्यापीठाने त्यांना १९६९ मध्ये त्यांना Distinguished woman of the year हे पारितोषिक आणि सुवर्णपदकही ही दिले. सन २०१३ मध्ये मुंबईमध्ये त्यांना ‘ जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित केले. ४ नोव्हेंबर २०१३ रोजी गुगल डुडल ने त्यांचा सन्मान केला.
गणन कौशल्याबाबतचे कार्यक्रम करून त्यांनी त्या क्षेत्रात उत्तुंग यश संपादित केले. एकविसाव्या शतकाच्या प्रारंभी त्या भारतात परतल्या. भारताचे नाव गणन क्षेत्रात अग्रभागी नेण्याचे काम त्यांनी खूपच निष्ठापूर्वक केले. त्यांनी काही पुस्तकेही लिहिली त्यापैकी गाजलेले पुस्तक म्हणजे Puzzles to puzzle you या पुस्तकात अनेक कुटप्रश्र्न आहेत या पुस्तकांच्या अनेक आवृत्त्याही निघालेल्या आहेत. त्यांचे दुसरे गाजलेले पुस्तक म्हणजे Finguring-The joy of numbers यामध्ये विविध प्रकारच्या संख्यांची नोंद आणि आकडेमोडींची नोंद आहे. तसेच काही कूटप्रश्न या पुस्तकातही आहेत.
सन १९६० मध्ये वयाच्या एकविसाव्या वर्षी त्यांचा विवाह कलकत्त्याच्या परितोष बॅनर्जी यांचे बरोबर झाला. ते एक सनदी अधिकारी होते. १९८० मध्ये श्रीमती शकुंतलादेवी यांनी माजी पंतप्रधान कै.श्रीमती इंदिरा गांधी यांच्याविरुद्ध कर्नाटकातील मेडक मतदार संघातून लोकसभेची निवडणूकही लढविली होती. आणीबाणी पुकारणाऱ्या व लोकशाहीचा गळा घोटाणाऱ्या घटनेबद्दलचा संताप आपल्या सभांमधून व्यक्त केला होता. मात्र या निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला.
कोणतेही औपचारिक शालेय अथवा महाविद्यालयीन शिक्षण घेतलेले नसतानाही ही त्यांनी बंगळुरु येथे ‘फाउंडेशन पब्लिक ट्रस्ट’ या संस्थेची स्थापना केली. ट्रस्टमार्फत गणित, ज्योतिषशास्त्र आणि दर्शनशास्त्र या विषयातील अभ्यासकांना प्रोत्साहन दिले आणि आर्थिक सहाय्य ही दिले. भारताची गणन क्षेत्रातील कामगिरी जगभरात उत्तुंग शिखरावर पोहोचविणाऱ्या या महान विभूतीची जीवनयात्रा २१ एप्रिल २०१३ रोजी समाप्त झाली.
एकाही गणिताचे चुकीचे उत्तर न देणाऱ्या या थोर मानवी संगणक विभूती ला विनम्र अभिवादन!!!
—
वाचत रहा
सोमवार ते शुक्रवार – गणित कोडे
शनिवारी – शंका-समाधान आणि गणितातील रंजक माहिती
रविवारी – ओळख भारतीय गणिततज्ज्ञांची