अंक मित्र कापरेकर गुरुजी
कापरेकर गुरुजी नाशिकचे. गणिताच्या क्षेत्रात त्यांचे योगदान अतिशय महत्त्वाचे आहे. गणिताच्या क्षेत्रात त्यांनी अमुलाग्र संकल्पना पुढे आणल्या. त्यांचे गणितातील योगदान आणि त्यांच्या कार्याचा आढावा घेणारा हा लेख…
प्रा. दिलीप गोटखिंडीकर
(लेखक गणितज्ज्ञ आहेत)
अंकमित्र दत्तात्रय रामचंद्र कापरेकर यांचा जन्म १७ जानेवारी १९०५ रोजी डहाणू महाराष्ट्र येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण ठाणे नगरपालिकेच्या शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण ठाण्याच्या बेहरामजी जीजीभाय हायस्कूलमध्ये झाले. १९२३ मध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्यांना रँग्लर र. पु. परांजपे रँग्लर ग. स. महाजनी आणि प्राध्यापक मो. ल. चांद्रत्रे यांचे मार्गदर्शन लाभले.
सन १९२७ मध्ये ते ज्युनियर बी. एस्सी.च्या वर्गात शिकत असताना त्यांनी एका राष्ट्रीय स्तरावरच्या निबंध स्पर्धेत भाग घेतला होता. या स्पर्धेसाठी त्यांनी ‘ थिअरी ऑफ इन्वेलोप्स ‘हा ९३ पानी निबंध लिहिला. या निबंधात दोन विभाग आणि पाच प्रकरणे होती. या निबंधाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. तेच त्यांचे पहिले दैदिप्यमान यश होय. त्यांनी १९२८ मध्ये बीएस्सी पदवी प्राप्त केल्यानंतर लगेच सेकंडरी टीचर सर्टिफिकेट कोर्स (STC) पूर्ण केला. ते १९२९ मध्ये मुंबईला कुलाबा वेधशाळेत नोकरी लागले. परंतु त्यांच्यातील गणित शिक्षकाने त्यांच्या खगोलशास्त्रीय कुतूहलावर मात केली आणि त्यांनी एका वर्षातच कुलाबा विविध शाळेतील नोकरी सोडली.
एक जून १९३० रोजी ते नाशिक जवळच्या देवळाली येथील झोराष्ट्रीयन रेसिडेंशियल स्कूल मध्ये शिक्षक पदावर नोकरी करू लागले. १३ डिसेंबर १९३२ रोजी त्यांचा विवाह झाला. सन १९३४ मध्ये रँगलर महाजनिंच्या अध्यक्षतेखाली झालेल्या गणिताच्या वार्षिक अधिवेशनात त्यांनी आपला पहिला शोधनिबंध सादर केला. तेव्हा अनेक गणितज्ञांनी त्यांना शाबासकी दिली. त्यांनी पहिल्याच संधीचे अक्षरशः सोने केले. त्यांना इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटीचे माननीय सभासद करून घेण्यात आले. सन १९३८ पासून एखाद्या वारकऱ्यांच्या निष्ठेने पदरमोड करून इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटीच्या वार्षिक अधिवेशनाला उपस्थित राहत असत. आणि प्रत्येक वेळी आपला शोधनिबंध सादर करीत असत. हे कार्य त्यांनी अव्याहतपणे १९८५ पर्यंत नित्यनियमाने केले.
सन १९४६ मध्ये आर्थिक डबघाईमुळे झोराष्ट्रीयन रेसिडेंशियल स्कूल बंद पडले. त्यानंतर ते देवळाली कॅम्प कॅन्टोन्मेंट हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून रुजू झाले. नाशिक येथे झालेल्या मराठी विज्ञान परिषदेच्या दुसऱ्या अधिवेशनात (सन १९६६) त्यांचा सन्मान कै. विष्णुपंत नारळीकर यांच्या हस्ते करण्यात आला. सन १९८४ मध्ये असोसिएशन ऑफ मॅथेमॅटिक्स ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळ यांच्या पुणे येथील संयुक्त अधिवेशनात त्यांचा सन्मान थोर वैज्ञानिक डॉ जयंत नारळीकर यांच्या हस्ते करण्यात आला. आणि त्यांना ‘अंक मित्र’ ही उपाधी देण्यात आली.
कापरेकर यांनी शोधलेल्या विविध संख्या पुढील प्रमाणे
(१) कापरेकर स्थिरांक ४९५ आणि ६१७४
(२) स्वयंभू संख्या आणि संगम संख्या
(३) डेमलो संख्या
(४) कापरेकर संख्या
(५) हर्षद संख्या
(६) दत्तात्रय संख्या
(७) विजय संख्या
(८) वानरी/मर्कट संख्या
(९) द्विमुखी संख्या
(१०) हस्तलाघव संख्या
(११) तिरप्या झेपेच्या संख्या
(१२) आंदोलन संख्या
(१३) विच्छेदनिय संख्या
(१४) रिक्त पद भरण संख्या
त्यांनी एकूण पस्तीस पुस्तके लिहिली. राष्ट्रीय स्तरावर ५० पेक्षा अधिक शोध निबंध सादर केले. त्यांच्या संशोधनासाठी त्यांना काही विद्यापीठांच्या शिष्यवृत्ती प्राप्त झाल्या. त्यांना ४ जुलै १९८६ रोजी नाशिक येथील तीळभांडे स्वाराजवळच्या अभिनव भारत मंदिर या वास्तूतील त्यांच्या निवासस्थानी देवाज्ञा झाली.
(गणिताच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या भारतीय गणितींची माहिती देणारे हे सदर दर रविवारी)