कोरोनाच्या परिस्थितीमुळे रंगभूमीवरील नाट्यप्रयोग तात्पुरते थांबले असले तरी अभिनय कल्याण संस्थेच्या कलाकारांनी यावर भन्नाट उपाय शोधून काढला आहे. रसिक प्रेक्षक नाटकांपासून दूर जावू नये यासाठी थिएटर प्रीमियर लीग अर्थात ‘ऑनलाईन नाट्य महोत्सव’ आयोजन करण्यात आला आहे.
—
हे असतील नाट्यप्रयोग
सतीश तांबे यांच्या रामायण कथेवर आधारित अभिजित झुंजारराव दिग्दर्शित ‘परमेश्वरी पाहुणा’, श्रीकांत देशमुख यांच्या कथेवर आधारित योगेश पाटील दिग्दर्शित ‘नली’, इरफान मुजावर लिखित मनोज भिसे दिग्दर्शित ‘अजूनही चांदरात आहे’ आणि प्रदीप राणे लिखित प्रमोद शेलार दिग्दर्शित ‘अँश इज बर्निंग’ या नाटकांचे सादरीकरण होणार आहे. या संपूर्ण नाट्यमहोत्सवासाठी नाममात्र १६० रुपये तिकीट असून १० सप्टेंबर (बुधवार) पासून तिकीट विक्री सुरु होत आहे.
—
प्रेक्षकवर्ग नाटकापासून वंचित राहू नये यासाठी ऑनलाईन नाट्यमहोत्सव ही संकल्पना मांडत आहोत. प्रेक्षकांना नाटकाचा आस्वाद घेता यावा, नाट्यगृह बंद असले तरी हक्काचा प्रेक्षकवर्ग दुरावला जावू नये यासाठी थिएटर पर्मियर लीग आयोजित केली आहे. नाटक सादर करण्याची तन्मयता कलाकाराला स्वस्थ बसू देत नसल्याने ऑनलाईन नाट्यमहोत्वाचा पर्याय सकारात्मक आहे.
अभिजित झुंजारराव, अभिनेते, दिग्दर्शक
—
२०१५ साली मी ‘अजूनही चांदरात आहे’ हे नाटक लिहिले. रसिकांसाठी विलक्षण अनुभव देणारा ठरले याची खात्री आहे. प्रीमियर लीगच्या माध्यमातून नाटक जिवंत ठेवण्याचा प्रयत्न आहे. ऑनलाईन स्वरूपात नाटक सादर करण्याची अनोखी संकल्पना आहे. यात सहभागी होत असल्याचा आनंद आहे.
इरफान मुजावर, अभिनेते, लेखक
—
नाट्यगृह सुरु होण्याची अद्याप शाश्वती नाही, त्यामुळे आसपासच्या साधनांच्या मदतीने नाटक सादर करण्याचा प्रयत्न याद्वारे केला आहे, ऑनलाईन नाटक सादर करण्याची अभिनय संकल्पना याद्वारे पुढे आली आहे. याद्वारे प्रयोग सादर करण्याचे समाधान मिळणार आहे.
हर्षल पाटील, अभिनेते