नाशिक :- एसटी कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांचे थकित वेतन दिवाळीपूर्वी न मिळाल्यास कर्मचाऱ्यांचा रोषाचे रूपांतर संपात झाल्यास एसटी प्रशासन जबाबदार राहिल असा इशारा महाराष्ट्र इंटक अध्यक्ष, माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांनी दिला आहे. एस.टी.कर्मचाऱ्यांचे ऑगस्ट,सप्टेंबर, ऑक्टोबर या तीन महिन्यांचे वेतन थकित असून यासंदर्भात कामगार उपायुक्त दाभाड़े, सहाय्यक कामगार आयुक्त माळी यांच्यासोबत महाराष्ट्र एसटी वर्कर्स कांग्रेस इंटक, एसटी महामंडळाच्या वतीने संयुक्तरित्या चर्चा करण्यात आली. यावेळी एसटी प्रशासनाच्या वतीने वेतन देण्याबाबत सकारात्मक प्रयत्न सुरु असल्याचे सांगण्यात आले. मात्र यासंदर्भात कोणताही निर्णय देण्यास असमर्थता व्यक्त केली.
महाराष्ट्र इंटक अध्यक्ष, माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे प्रभारी उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. अविनाश ढाकणे यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधून चर्चा केली. याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेऊन उद्यापर्यंत एक महिन्याचे व दिवाळीपूर्वी दोन महिन्यांचे थकित वेतन देण्याचे प्रयत्न करीत आहोत असे आश्वासन त्यांनी दिले. परंतु, दोन महिन्यांचे थकित वेतन दिवाळीपूर्वी न मिळाल्यास कर्मचाऱ्यांचा रोषाचे रूपांतर संपात झाल्यास एसटी प्रशासन जबाबदार राहिल असा इशारा जयप्रकाश छाजेड यांनी दिला.
बैठकीस महाराष्ट्र एसटी वर्कर्स कांग्रेस इंटकच्या वतीने महाराष्ट्र इंटक अध्यक्ष, माजी आमदार जयप्रकाश छाजेड, एस. टी. प्रशासनाच्या वतीने विभाग नियंत्रक नितीन मैंद, विभागीय वाहतूक अधिकारी कैलास पाटिल, गोहाड, कामगार अधिकारी जहांआरा शेख, विधि अधिकारी सतीश मोहोड़ तसेच महाराष्ट्र एस. टी. वर्कर्स कांग्रेस इंटकचे विजय गायकवाड़, आर.डी. गवळी, अशोक जाधव, शरद गिते उपस्थित होते.