मुंबई : वीजबिल वसुलीची मोहीम राबवून थकबाकी वसूल करण्याचे व थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा त्वरित खंडित करण्याचे आदेश महावितरणने सर्व क्षेत्रिय कार्यालयास आज दिले आहेत. डिसेंबर २०२० अखेर राज्यात एकूण ६३ हजार ७४० कोटी रुपयांची थकबाकी असून यामुळे महावितरणची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. आता जर ग्राहकांनी वीज बिल भरले नाही तर वीज पुरवठा खंडित करण्याशिवाय महावितरणसमोर कोणताच पर्याय उरलेला नाही.
डिसेंबर अखेर राज्यातील कृषिपंप ग्राहकांकडे ४५ हजार ४९८ कोटी रुपयांची थकबाकी आहे तर वाणिज्यिक, घरगुती व औदयोगिक ग्राहकांकडे ८४८५ कोटी रुपये व उच्चदाब ग्राहकांकडे २४३५ कोटी रुपयांची थकबाकी आहे. राज्यात मार्च २०२० मध्ये कोविड 19 मूळे लॉकडाऊनच्या काळात थकबाकीपोटी वीज पुरवठा खंडित न करण्याचा महावितरणने निर्णय घेतला होता व राज्याचे उर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा डिसेंबर अखेरपर्यत खंडित न करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या.
थकबाकीदार ग्राहकांना वीज बिल सुलभ हत्यामध्ये भरण्याची सवलत महावितरणने दिलेली आहे. सोबतच थकबाकीवर विलंब आकार न लावण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. तसेच ग्राहकांच्या वीज बिलासंबंधी तक्रारी असल्यास त्या तात्काळ सोडविण्याचे आदेश सुद्धा दिलेले आहेत.
मध्यंतरी लॉकडाऊनच्या काळात खाजगी वीज वितरण कंपन्यांनी थकबाकी वसूल करण्यासाठी महाराष्ट्र वीज नियामक आयोगाची रीतसर परवानगी घेऊन सप्टेंबर २०२० मध्ये थकबाकी वसुलीची मोहीम मुंबई व मुंबई उपनगरात चालू केली व थकबाकीपोटी अनेक ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत केला. मात्र राज्याचे उर्जामंत्री डॉ राऊत यांनी डिसेंबर अखेरपर्यंत थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित न करण्याचे महावितरणला निर्देश दिले होते. परंतु आता थकबाकीचा डोंगर वाढल्याने दैनंदिन कामकाज चालविणे महावितरणला शक्य होत नसल्याने, बँकांची व इतर देणी व कर्मचाऱ्यांचा पगार देणेही अशक्य झाले आहे.
ग्राहकांना वीज पुरवठा करण्यासाठी महावितरणला वीज खरेदीसाठी पुरवठादारांना रोजच पैसे द्यावे लागतात. प्रचंड वाढलेल्या थकबाकीमुळे आता यापुढे थकबाकी वसूल करण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांना जानेवारीपासून मोहिमा राबविण्याचे निर्देश महावितरणने दिले असून थकबाकी वसुलीत कसूर करणारे अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाईचे संकेतही दिले आहे. तेंव्हा थकबाकीदार ग्राहकांनी आपल्या वीज बिलाचा भरणा करून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.