नवी दिल्ली – महिला व बाल विकास मंत्रालयातर्फे पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२१ अंतर्गत अर्ज मागवण्यात येत आहेत. विद्यार्थी व संस्थांकडून नामांकन अर्ज मागवण्यात आले आहेत. देशभरतील गुणवंत विद्यार्थी, तरुण व संस्थांचा सन्मान पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्काराने केला जातो. बालशक्ती पुरस्कार आणि बालकल्याण पुरस्कार या विभागांतर्गत पुरस्कार देण्यात येतात. संबंधित पुरस्करासाठी अर्ज प्रक्रिया सुरु झालेली असून १५ सप्टेंबर पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या एक आठवडाआधी राष्ट्रपतींच्या हस्ते, राष्ट्रपती भवन येथे पुरस्कार प्रदान केले जातात. भारताचे पंतप्रधान देखील पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करतात. त्याचप्रमाणे बाल शक्ती पुरस्कारातील विजेत्यांना २६ जानेवारी रोजी राजपथ येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिनावाच्या संचालनात सहभागी होण्याची संधी मिळते. नवोन्मेष, शैक्षणिक, क्रीडा, कला, सांस्कृतिक, समाजसेवा आणि शौर्य अशा विविध क्षेत्रात विलक्षण कामगिरीत केलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानित केले जाते. बालविकास, बालसंरक्षण आणि बालकल्याण या क्षेत्रात मुलांसाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती व संस्थांना सन्मानित करण्यासाठी बालकल्याण पुरस्काराची सुरुवात करण्यात आली. यासंबंधी पुरस्कारांसाठीची मार्गदर्शक तत्वे www.nca-wcd.nic.in या वेबसाइटवर सुरु करण्यात आले आहेत. अर्जदारांनी केलेले ऑनलाइन अर्जच ग्राह्य धरले जातील. अन्य कोणत्याही मार्गाने सादर केलेल्या अर्जाचा पुरस्कारासाठी विचार केला जाणार नाही असे नमूद करण्यात आले आहे. पोर्टल हाताळताना कोणतीही अडचण आल्यास ते तात्काळ मंत्रालयाच्या निदर्शनास आणून देणे शक्य असल्याचे यात स्पष्ट करण्यात आले आहे. यावर्षी अर्ज सादर करण्यासाठी १५ सप्टेंबर पर्यंत मुदत देण्यात आली आहे. आयसीसीडब्ल्यूच्या राष्ट्रीय शौर्य पुरस्कारांच्या नावाने खासगी संस्थेकडून देण्यात आलेल्या काही पुरस्कारांना मंत्रालयातर्फे मान्यता देण्यात आलेली नाही.