नवी दिल्ली : राष्ट्रीय महामार्गावर टोल देण्याकरिता वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात, त्यामुळे सरकारने फास्ट टॅगची सुविधा निर्माण केली आहे. मात्र फास्ट टॅग नसेल तर १ जानेवारीपासून वाहनांना दुप्पट टोल द्यावा लागणार आहे.
भारतात फास्ट टॅग अनिवार्य करण्यासाठी एक मार्गदर्शक तत्त्व आधीच जारी केले गेले आहे. आत्ता सध्या एका दिवसात सुमारे ५० लाख व्यवहार यातून होत आहेत. यासंदर्भात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने (एनएचएआय) यापूर्वी आपल्या एका ट्विटद्वारे या नियमाच्या अंमलबजावणी बाबत सूचना दिली आहे. १ जानेवारीपासून सरकारने नवीन आणि जुन्या सर्व वाहनांवर फास्ट टॅग लावणे बंधनकारक केले आहे. फास्ट टॅग नसलेल्या वाहनांकडून दुप्पट टोल घेण्यात येणार आहेत. म्हणजे राष्ट्रीय महामार्गावरुन एकदाच जात असाल तर दोन्ही बाजूंकडून आपणाकडून शुल्क आकारले जाईल. अशा परिस्थितीत, आपल्या कारवर फास्टॅग बसविणे चांगले व अगदी सोयीस्कर आहे, कारण ते टोल प्लाझाला जाम करत नाही, आपले इंधन वाचवते आणि टोलवर गाडी थांबविण्याची आवश्यकता नाही.
आपण कोणत्याही राष्ट्रीय महामार्गाच्या टोल प्लाझावरून किंवा पेटीएम, अॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय, एसबीआय, बँक ऑफ बडोदा येथून फास्ट टॅग खरेदी करू शकता. एकूण २२ बँकांमध्ये सरकारने फास्टटॅग देण्याची सुविधादेखील उपलब्ध करुन दिली आहे. एवढेच नाही तर ते आरटीओ, सामान्य सेवा केंद्रे आणि अगदी पेट्रोल पंपांकडूनही ऑनलाईन खरेदी करू शकता.