नाशिक – त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी तालुक्यामध्ये विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांची बाजारपेठांमध्ये गर्दी होऊ नये यासाठी सायंकाळी ७ ते सकाळी ५ वाजेपर्यंत संपूर्ण बंद ठेवण्याचे आदेश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आवाक्यात राहावा यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावीत. बाजारात होणारी नागरिकांची गर्दी रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या मदतीने दंडात्मक कारवाई करावी, असे निर्देश भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना दिले.
त्र्यंबकेश्वर रोडवरील ब्रम्हा व्हॅली महाविद्यालयात इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील उपचारसंबंधी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत भुजबळ बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आमदार हिरामण खोसकर, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निखिल सैंदाने,जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ कपिल आहेर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ अनंत पवार, तहसीलदार दीपक गिरासे, गट विकास अधिकारी मुरकुटे, त्र्यंबकेश्वर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ योगेश मोरे, इगतपुरी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. तोराब अली देशमुख आदी उपस्थित होते.
तालुक्यातील ज्या हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनची सुविधा आहे, अशा ठिकाणी ऑक्सिजनची सेंट्रल सिस्टीम सुरू करण्यासाठीचे व्यवस्थापन करावे. व्हेंटिलेटर्सबाबत जिथे आवश्यक आहे तिथे ते वेळेत पोहचण्यासाठीचे नियोजन करा. तसेच यासाठी आवश्यक अधिकारी व कर्मचारी यांच्या सेवा अधिग्रहित करून त्यांच्यावर जबाबदाऱ्या निश्चित करून देण्यात याव्या, अशा सूचना देखील यावेळी पालकमंत्री श्री भुजबळ यांनी केल्या.
तालुक्यांमध्ये ऑक्सिजनचा मुबलक साठा आहे, त्याचे नियोजनही युद्धपातळीवर झाले आहे; सध्या राज्यात जवळपास सर्वच स्तरावर लॉकडाऊन बंद केलेला नाही; मात्र नागरिकांनी याचा अर्थ असा घेऊ नये की कोरोना विषाणूचा नायनाट झाला आहे. या विषाणूसोबत जगताना आपण आपली काळजी घेणे आवश्यक आहे. शासनाने घालून दिलेल्या निकषांचे काटेकोरपणे पालन कसे होईल याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. निकषांचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर, दुकानदारांवर कठोर कारवाई करण्यात यावी असेही भुजबळ यांनी यावेळी सांगितले.
जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी बोलताना, राज्य शासनातर्फे सुरू करण्यात आलेली माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेत सर्वच स्तरावरील नागरिकांनी समाविष्ट होण्याचे आवाहन केले. जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी कर्मचारी आपल्याकडे या योजनेचा भाग म्हणून येतील तेव्हा त्यांना योग्य ते सहकार्य करण्याचे आवाहन जि. प. अध्यक्ष श्री क्षीरसागर यांनी केले.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आमदार हिरामण खोसकर, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कोरोना विषाणूबाबत परिस्थिती विशद केली.