राज्य सरकार कडून निधी साठी पाठपुरावा करू – आमदार हिरामण खोसकर
…
त्र्यंबकेश्वर – त्र्यंबकेश्वर हे साक्षात कैलास असल्याची अनेक साधु महंत व वारक-याची भावना असून संत श्रेष्ठ निवृत्तीनाथानी समाधी घेतल्याने पावन झालेल्या समाधी मंदिराचा सर्वागिण विकास करण्यासाठी कट्टीबद्ध असून वारक-यांना कायमस्वरूपी पायाभूत सुविधा देण्यासाठी राज्य सरकार कडून निधी साठी पाठपुरावा करू असे प्रतिपादन संत निवृत्तीनाथाच्या शासकीय महापूजेनंतर आमदार हिरामण खोसकर यांनी केले.
पौषवारी निमित्ताने संत निवृत्तीनाथ समाधीची शासकीय महापूजा नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांनी सहपत्नीक केली. यावेळी आमदार हिरामण खोसकर, जेष्ठ नेते संपतराव सकाळे, भाजपा नेते लक्ष्मण सावजी, जेष्ठ नेते सुरेश गंगापुत्र,उपनगराध्यक्ष सागर उजे, नगरसेवक स्वप्नील शेलार,विष्णु दोबाडे, श्याम गंगापुत्र,मुख्याधिकारी संजय जाधव, पुजारी योगेश गोसावी,युवराज कोठुळे आदी उपस्थित होते.
यावेळी संत निवृत्तीनाथ समाधी संस्थानचे प्रशासक सदस्य अॅड.भाऊसाहेब गंबीरे यांनी प्रास्ताविक करून संस्थान तर्फे करण्यात आलेल्या कामाची माहीती दिली. तसेच भव्य समाधी मंदिर उभारण्यासाठी शासना कडून तीर्थक्षेत्रा प्रमाणे निधी आणण्यासाठी संस्थानच्या पाठीशी उभे राहुन वारक-याच्या आद्यपीठाचा विकास करावा अशी मागणी केली. यावेळी समाधी संस्थांन व नगरपालिकेतर्फे उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. नगरपालिकेचे सर्व नगरसेवक व नगरसेविका,रामनाथ बोडके,पिंटु बोडके,विशाल सकाळे,भुषण अडसरे,नितीन पवार , किरण चौधरी,विशाल सकाळे,जयराम मोढे आदी उपस्थित होते.
दरम्यान रविवारी रात्री ११ ते १ या वेळेत संस्थानकडुन नाथांची महापूजा करण्यात आली. धर्मादाय आयुक्त के.एम. सोनवणे साहेब, प्रशासक अॅड. भाऊसाहेब गंभीरे,वारकरी यांच्या हस्ते रविवारी रात्री १२ वाजता महापूजा करण्यात आली यावेळी गंगाराम खोडे,संदिप मुळाणे,विष्णु बदादे,दादा आचारी,मनोज भांगरे आदी उपस्थित होते. रात्री वारकरी मंडाळाचे भजन जागर झाले. सोबत बेलापूर महाराज यांचे किर्तन झाले.
तीन वर्षां शासनाकडून जाहीर झालेले २ कोटी २३ लाख रूपये कागदावरच
तीन वर्षापूर्वी तत्कालीन पालकमंत्री गिरीष महाजन यांनी संत निवृत्तीनाथ संस्थानाच्या पायाभूत सुविधासाठी जाहीर केलेले २ कोटी २३ लाख रूपये कागदावरच असून त्यात एक रुपयाही विकासकामासाठी आलेले नसल्याने यावेळी महापुजा प्रसंगी नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांनी संस्थानाच्या कारभारावर बोट ठेवत संस्थानाचे माजी अध्यक्ष संजय धोडगे यांचे नाव घेत योग्य रितीने प्रस्ताव नगरपालिके मार्फत सादर न केल्यानेच निधी आला नसल्याचे सांगितले. आता तरी संस्थाने योग्य रितीने प्रस्ताव सादर करून निधी पदरात पाडून घेण्याचे आवाहन केले.