त्र्यंबकेश्वर – शेकडो वर्षीची पंरपरा असलेला श्री निवृत्तीनाथांचा रथोत्सव मिरवणूक कार्यक्रम कोरोनाने रद्द करुन पालखी मधून मिरवणूक दुपारी ठीक ४ वाजता श्री निवृत्तीनाथांची चांदीची प्रतिमा पानाफुलांनी सजविलेल्या पालखीत विराजमान करण्यात आली. पालखी मंदिरातून बाहेर आणून ठिक ४.३० वाजता पालखी मंदिरासमोरून हालली. सर्वात पुढे बॅडपथक, नंतर झेंडेकरी, त्यामागे डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला, विणेकरी, टाळकरी, पखवाज वादक, प्रशासकीय अधिकारी, दिंड्यांचे मानकरी, नामवंत किर्तनकार, भाविक, असा सर्व लवाजमा निघाला. पालखी अल्पबचत भवन, चौकीमाथा, सुंदराबाई मठ, तेली गल्ली, पाटील गल्ली, पोस्ट गल्ली मार्गे श्री त्र्यंबकेश्वराच्या मंदिरात पोहचला. पालखी मार्गावर ठिकठिकाणी नाथांच्या प्रतिमेचं औक्षण करण्यात आले. मंदिरात शिवस्वरूप निवृत्तीनाथ आणि भगवान त्र्यंबकेश्वराची भेट घडविण्यात आली.नाथांची मूर्ती काही वेळ पिंडीवर विराजमान करण्यात आली. मंदिराच्या प्रांगणात बराचवेळ अभंग गायन करण्यात आले. यानंतर पालखी परतीच्या प्रवासाला निघाली. पालखी लक्ष्मीनारायण चौक, मेनरोड मार्गे तीर्थराज कुशावर्तावर आणण्यात आला. तेथे पवित्र गोदामाईला वंदन करून निवृत्तीनाथ मंदिरात नेण्यात आला.त्यानंतर कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला. मिरवणुकी दरम्यान ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली.