श्री .निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थानच्या प्रशासकीय समितीचे अॅड. भाऊसाहेब गंभीरे यांनी दिली माहिती
…
त्र्यंबकेश्वर – सदगुरु निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थानच्या पौष वारी सोहळ्याच्या महापूजेचा मान वारक-यांना देण्याचा निर्णय संस्थानच्या प्रशासकीय समितीने घेतला आहे. यावर्षीच्या सर्व महापूजा राज्यभरातून आलेल्या वारक-यांच्या दिंड्यामधील वारक-यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आल्याची माहिती प्रशासकीय समितीचे अॅड. भाऊसाहेब गंभीरे यांनी दिली आहे.
श्री. निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थानचा कार्यभार हाती घेतल्यानंतर प्रशासकीय समितीची सभा सहायक धर्मादाय आयुक्त के.एम. सोनवणे यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी प्रशासक समितीचे सदस्य अॅड. भाऊसाहेब गंभीरे, त्र्यंबकेश्वरचे पोलिस निरीक्षक संदीप रणदिवे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी संजय जाधव हे उपस्थित होते. वारक-यांचे श्रध्दास्थान असलेल्या संस्थानचा कारभार वारक-याभिमुख करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. कोविड -१९ च्या संसर्गच्या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या उपाययोजना करुन तसेच प्रशासनाचे नियम पाळून नित्यपूजा करण्याचा निर्णय घेण्यात आला. ६ ते ९ फेब्रुवारी या काळात पहाटे ५ वाजता होणा-या महापूजा दिंडीमधील वारक-यांच्या हस्ते करण्यात येणार आहेत. त्याबरोबरच ७ फेब्रुवारी रोजी रात्री होणारी महापूजाही वारक-यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. महापूजेचा मान मिळणा-या वारक-याचा संस्थानतर्फे सन्मान करण्यात येणार आहे. त्र्यंबकेश्वर नगरपालिकेतर्फे ८ फेब्रुवारी रोजी महापूजा होईल.
याबरोबरच दरवर्षीप्रमाणे होणारे कार्यक्रमही अखंडीत होणार आहेत. प्रशासनाने परवानगी दिलेल्या निवडक दिंड्यामधील वारक-यांची संस्थानच्या परिसरात सोय करण्यात आली आहे. या दिंड्यामधील वारक-यांचे भजन – किर्तनाचे कार्यक्रम होणार आहेत. वारक-यांच्या सोयीसुविधांसाठी समिती प्रशानाशी समन्वय साधत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. श्रीक्षेत्र आळंदी , श्रीक्षेत्र देहु, श्रीक्षेत्र पंढरपूर, श्रीक्षेत्र मुक्ताईनगर या ठिकाणाहून येणा-या तसेच नाशिक जिल्हयातील दिंड्याचाही सोयीसाठी प्रशासकीय समिती प्रयत्नशील असल्याचे गंभीरे यांनी सांगितले. दरम्यान कोविड १९ चा संसर्ग लक्षात घेता वारकरी बांधवानी सहकार्य करावे असे आवाहन प्रशासकीय समितीने केले आहे.