ज्ञानेश्वर महाले, त्र्यंबकेश्वर
नाशिक जिल्ह्यातील अतिदुर्गम, अतिमागास आदिवासी भागातील आदिवासींच्या जीवनात परिणामकारक परिवर्तन करण्याचा ध्यास घेतलेले कुटुंब म्हणजे माळेकर कुटुंब. पाच दशकांहून अधिक काळ निबिड जंगली भागातील सेवा कार्याला जीवनमान वाहून घेतलेले हे कुटुंब आहे. पेठ -त्र्यंबकेश्वर ह्या दोन्ही तालुक्यातील लोकांचे सर्वमान्य समावेशक नेतृत्व कै. शंकर उर्फ काळू पाटील माळेकर यांच्या स्वप्नातील विकास साध्य करण्यासाठी श्रीमती ताराबाई माळेकर, इंजि. विनायक माळेकर, जिल्हा परिषद सदस्या इंजि. रुपांजली माळेकर यांनी अनेक वर्षांपासून जीवाचे रान केलेले आहे.
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असणाऱ्या नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती पदावर श्रीमती ताराबाई माळेकर यांची आज निवड झाली आहे. माळेकर कुटुंबाने आतापर्यंत आदिवासींच्या विकासासाठी वर्षानुवर्षाची खडतर तपश्चर्या केलेली आहे. ही तपश्चर्या आज फळाला आली असे म्हणावे लागेल. आदिवासींच्या आयुष्याचा कायापालट, शेतकऱ्यांच्या हक्काला नवी दिशा आणि विकासाचा अंधारा कोपरा प्रकाशमान करण्यासाठी झटणाऱ्या माळेकर कुटुंबाला उपसभापती पद मिळाल्याने खऱ्या अर्थाने पदाचा सन्मान वाढला आहे.
समाजकारणाला प्राधान्य देऊन विकासाभिमुख राजकारणाची मुहूर्तमेढ सारस्ते ( ता. त्र्यंबकेश्वर ) येथील कै. शंकर उर्फ काळू पाटील माळेकर यांनी रचली. त्यांनी उभ्या केलेल्या व्यापक कामांमुळे घराघरात, मनामनात त्यांचे अबाधित स्थान निर्माण झाले. त्यांनी इंदिरा काॅग्रेसच्या अध्यक्षपदावर ३० वर्ष आणि सलग २५ वर्ष मजुर फेडरेशनच्या संचालकपदावर काम केले. जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सभापती म्हणूनही त्यांनी कारकीर्द गाजवलेली आहे. त्यांच्यानंतर रक्तातच वडिलांचे साहस, संयम, अभ्यास, आक्रमकता, दूरदृष्टी आणि भविष्याचा वेध घेण्याचे गुण असलेला इंजि. विनायक माळेकर नावाचा कोहिनुर हिरा जनसेवेसाठी सातत्याने उभा आहे. सामान्य लोकांच्या अनेकानेक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी इंजि. विनायक माळेकर यांचे अविरत कार्य सुरू आहे. अतिशय प्रतिष्ठेच्या जिल्हा नियोजन समिती व दिशा समितीच्या सदस्यपदावर अत्यंत अभ्यासू पणाने काम करून त्यांनी नाशिकच्या इतिहासात न सुटणारे विविध प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला.
जिल्हा परिषदेच्या अटीतटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत त्यांनी प्राध्यापक कॉम्पुटर इंजिनीअर असलेल्या त्यांच्या सौभाग्यवती इंजि. रुपांजली विनायक माळेकर यांना लोकांच्या आग्रहात्सव मैदानात उतरवले. हरसूल जिल्हा परिषद गटातून इंजि. रूपांजली विनायक माळेकर यांना अपक्ष असूनही ऐतिहासिक विजय संपादन करीत निवडून आणले. यानंतर विकासाची घोडदौड अद्यापही सुरूच आहे.
वाघाच्या तोंडात हात घालावा इतक्या सहजतेने परिस्थितीच्या छाताडावर पाय रोवून जनतेसाठी काम करणारे इंजि. विनायक माळेकर ओळखले जातात. त्यांच्या नियोजन कौशल्यातून राज्यात प्रतिष्ठित असणाऱ्या नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती पदावर आई श्रीमती ताराबाई माळेकर यांची निवड आज निवड झाली. माळेकर कुटुंबाच्या रक्तातच पिढ्यानपिढ्या जनसेवा ठासून भरलेली आहे. म्हणूनच आज श्रीमती ताराबाई माळेकर यांनी झालेली सार्थ निवड निश्चितच वेगवान विकासाचा आलेख वाढवून सामान्य जनतेच्या हृदयातील समाधान वाढवणारी ठरेल ह्यात अजिबात शंका नाही. ५० वर्षांपासून आदिवासींच्या विकासाला मोलाचे योगदान देणाऱ्या माळेकर कुटुंबाने केलेल्या निस्वार्थी कामांबद्धल त्यांचे विशेष अभिनंदन….!