हिमांशू देवरे, त्र्यंबकेश्वर
…..
चैतन्यमय व धार्मिक वातावरणात सोमवारी पहाटे मंदिर उघडले. कोरोना काळात सरकारने दिलेल्या सर्व नियमांचे पालन करत भाविकांनी सोमवारी दर्शन घेतले. मंदिर सुरू झाल्याने भविकांत समाधान व्यक्त होत आहे.
सर्व प्रथम श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टकडून त्र्यंबकेश्वर मंदिरात पहाटे पूजा करण्यात आली या नंतर भगवान त्र्यंबकेश्वराचा जयजयकार करीत सुप्रभाती ६ वाजता मंदिराचे महाद्वार उघडण्यात आले. यावेळी भाविक पुरोहित संघ प्रतिनिधी तुंगार ट्रस्ट, शिवसैनिक उपस्थित होते. देवस्थानचे विश्वस्त संतोष कदम, प्रशांत गायधनी, दिलीप तुंगार, पुजारी उल्हास तुंगार, देवस्थानचे अधिकारी समीर वैद्य, राजाभाऊ जोशी व अन्य उपस्थित होते. पहाटे ५ वाजता नगरपालिका मुख्याधिकारी व ट्रस्ट सचिव संजय जाधव हे पूजेसाठी उपस्थितीत होते. पूर्व दरवाजाने रांगेने बाहेरगावच्या भाविकांना मंदिरत प्रवेश देण्यात आला. सॅनिटायझर, अॅाक्सिमीटरने तपासणी करण्यात येत होती.
गोदावरी मंदिर, कुशावर्त, संत निवृत्तिनाथ मंदिर खुले
आज पाडव्याच्या मुहूर्तावर गोदावरी मंदिर, कुशावर्त तीर्थ व संत निवृत्तिनाथ महाराज मंदिर खुले झाल्याने वारकरी यात्रेकरू सुखावले आहेत. गेले २४२ दिवस भाविक गंगास्नानाला मुकले होते आज अनेकांनी वंदन करून हातपाय धुवून दर्शन घेतले नगरपालिकेने एक जाळी बाजूला करून भविकांच्या भावना जपल्या. नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांनी दर्शनाचा लाभ घेतला. तर संत निवृत्तिनाथ मंदिरात नाथांच्या समाधीची व मूर्तीची पूजा पुजारी जयंत गोसावी व योगेश गोसावी यांनी केली.
दरम्यान सॅनिटायझर सुविधा तपासणी करून भाविकांना मंदिरात सोडले जात होते. नियम पालन होते की नाही याची शहनिशा विश्वस्त रामभाऊ मुळाणे यांनी भेट देऊन केली. ट्रस्ट मंडळाने शासनाला धन्यवाद दिले आहे. कुशावर्तावर नियोजन तयार झाले आहे, असे मुख्याधिकारी संजय जाधव यांनी सांगितले. दुपारी त्र्यंबकेश्वर पालखी सोहळा झाला. भाजपच्या वतीने त्र्यंबकेश्वर मंदिरासमोर आरती करून पेढे वाटप करण्यात आले. गंगा मंदिरात दक्षता घेत असल्याचे या ट्रस्टचे पदाधिकारी बाळासाहेब दीक्षित व गणेश भुजंग यांनी सांगितले.