त्र्यंबकेश्वर – त्र्यंबकेश्वर नगर पालिकेचे विद्यमान नगरसेवक व माजी उपनगराध्यक्ष स्वप्नील दिलीप शेलार यांना अप्पर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांनी अपात्र ठरविल्याचा निकाल दिला आहे. येथील माहिती अधिकार कार्यकर्ते चंद्रकांत पाठक यांनी स्वप्नील शेलार हे नगर पालिकेचे लाभार्थी असल्याचे व त्यांनी माहिती दडवून ठेवल्याचा अर्ज मागच्या महिन्यात जिल्हाधिकारी यांच्याकडे करत अपात्रतेची मागणी केली होती. नगरसेवक स्वप्नील शेलार यांनी डिसेंबर २०१७ मध्ये प्रभाग क्रमांक ५ मधून भाजपा चिन्हावर निवडणूक लढवली होती. त्यात त्यांना विजय मिळाला होता. त्यांनी काही वर्षांपासून नगर पालिकेच्या मालकीची असलेली शिवनेरी धर्मशाळा ठेकेदारी पध्दतीने चालवायला घेतलेली होती. सार्वत्रिक निवडणूक झाली तेव्हा व त्यानंतर देखील धर्मशाळेचा ठेका त्यांच्या नावावर होता. याची माहिती चंद्रकांत गणपतराव पाठक यांनी मिळवली आणि अर्ज दाखल केला होता. त्यावर सुनावणी होऊन मंगळवारी आदेश प्राप्त झाला आहे. दरम्यान या वृत्ताने त्र्यंबकेश्वरमध्ये खळबळ उडाली आहे. चंद्रकांत पाठक यांनी सर्व १८ नगरसेवक यांना अतिक्रमणाच्या मुद्यावर अपात्र ठरवावे असा दुसरा अर्ज जिल्हाधिकारी यांच्याकडे केलेला आहे. त्यावर सुनावणी सुरू असून या दुस-या दाव्याच्या बाबत काय होते याकडे लक्ष लगलेले आहे.