नाशिक – त्र्यंबकेश्वर येथील कोविड केंद्रात कोविड योद्धा म्हणून आपली जबाबदारी पार पाडतानाच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णांना योगाचे धडे देऊन तर प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी यांनी रुग्णांसाठी भक्तीगीत गाऊन रुग्णांमध्ये प्रतिकारक क्षमता व सकारात्मक उर्जा निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
कोविड रुग्णांवर योग्य उपचार आणि या विषाणूपासून बचावासाठी तालुकास्तरावर कोविड केअर सेंटरची निर्मिती करण्यात आली आहे. या केंद्रावर आरोग्य अधिकारी, कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी प्रत्यक्ष रुग्णांवर उपचार करून कोरोना योध्यांची भूमिका पार पाडत आहेत. कोरोनाला दूर सारण्यासाठी रोग प्रतिकारक क्षमता वाढविणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील त्रंबकेश्वर येथे जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या कोविड केंद्रात कोविड योद्धा म्हणून काम करणारे आरोग्य अधिकारी डॉ. श्रवण शिरसाठ हे प्रत्यक्ष कोविड रुग्णांनाच योगाचे धडे देत आहेत. कोविड सेंटरच्या आवारातील मोकळ्या जागेत सर्व रुग्णांना बसवून रोज सकाळी त्यांच्याकडून योगा करून घेतला जात आहे. वैद्यकीय उपचारासोबतच अशा रुग्णांना मानसिक आधार, त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी आणि त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास योगाची मदत होईल या संकल्पनेतून कोविड झालेल्या रुग्णांना योग शिकविण्यात येत आहे. याच केंद्रात अबोली येथे कार्यरत असलेले प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी विनोद पवार हे रुग्णांसाठी भक्तीगीत गात असून सर्व रुग्ण भाक्तीगीतात तल्लीन होऊन या उपक्रमास चांगला प्रतिसाद देत आहेत.
कोविड योद्धा म्हणून कर्तव्य बजावत असतानाच निस्वार्थ भावनेने सामाजिक बांधिलकी म्हणून रुग्णांची सेवा करणाऱ्या डॉ.श्रवण शिरसाठ व विनोद पवार यांचे कार्य कौतुकास्पद आणि प्रशंसनीय आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.