हरसुल जिल्हा परिषद सदस्या रुपांजली माळेकर व सभापती मोतीराम दिवे यांनी दिल्या अचानक भेटी, महिलांचे आरोग्य धोक्यात असल्याच्या केल्या तक्रारी
……
त्र्यंबकेश्वर – त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आरोग्य केंद्रांमध्ये कोरोना महामारीच्या दरम्यान महिला कुटुंब नियोजन शस्रक्रिया थांबल्या होत्या. तर लॉकडाउन शिथिल होताच तालुक्यातील अनेक आरोग्य केंद्रांत शस्रक्रिया सुरु झाल्या. पण, येथील स्थिती काय हे बघण्यासाठी हरसुल जिल्हा परिषद सदस्या रुपांजली माळेकर व सभापती मोतीराम दिवे यांनी भेटी दिल्या. त्यानंतर त्यांनी येथे शासनाने दिलेल्या नियमांना डावलून शिरसगाव, ठाणापाडा आरोग्य केंद्रांवर स्तनदा मातांना अक्षरश: शस्रक्रियेच्या नावाखाली वेठीस धरण्याचा प्रकार होत असल्याचे सांगितले. २० जानेवारीच्या रात्री एक वाजता अचानक दिलेल्या भेटीमुळे हा प्रकार समोर आल्याचेही त्यांनी सांगितले.
या भेटीबाबत बोलतांना माळेकर व दिवे यांनी सांगितले की, आमच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्यानंतर शहानिशा करण्यासाठी आम्ही दोन्ही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बुधवारी मध्यरात्री महिला कुटुंब नियोजन शस्रक्रिया झालेल्या आरोग्य केंद्रांना भेट दिली. त्यामध्ये शिरसगाव आरोग्य केंद्रात २५ बाय २५ फुटाच्या खोलीत, वार्डात कुठल्याही निर्जंतुकीकरणाची सुविधा न पार पाडताच फर्चीवर अंथरून टाकून महिला रुग्णांना झोपवण्यात आले होते. प्रत्यक्षात शिरसगाव आरोग्य केंद्रास १५० महीला कुटुंब नियोजन टार्गेट असतांना, टार्गेट पूर्ण करण्यासाठी तालुक्यातील आरोग्य कर्मचारी क्षमेतेपेक्षा दुप्पट शस्त्रक्रिया करून स्तनदा मतांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार चालू असल्याचे त्यांनी सांगितले.
त्र्यंबकेश्वर तालुक्यात नसबंदी शस्रक्रिया करण्यासाठी एकच वैद्यकीय अधिकारी उपलब्ध आहे, सदर वैद्यकीय अधिकारी शस्रक्रिया करून गेल्यानंतर रुग्णांना चार दिवस निगराणीत ठेवण्यात येते. पण शास्राक्रियानंतर चार दिवस मोठ्या प्रमाणात हेळसांड होत असते.कोरोनाच्या काळात कुठलेही नियम निकष न पाळता एकच खोलीत जमिनीवर दाटीवाटीने त्यांना झोपवण्यात येते. तर त्यांच्या सोबत येणाऱ्या लहान बालक व नातेवाईकांना बाहेर व्हरांड्यातच झोपावे लागते असेह त्यांनी सांगितले.
यावेळी स्तनदा मातांना गरम पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आढळून आली नाही. शासनाच्या नसबंदीच्या टार्गेट साठी स्तनदा मतांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या आरोग्य यंत्रणेवर वेळीच भेट देऊन वरील प्रकार उजेडात आणला असुन कारवाईची करावी अशी मागणी जिल्हा परिषद सदस्या रुपांजली माळेकर, सभापती मोतीराम दिवे, विनायक माळेकर,समाधान बोडके, युवा नेते मिथुन राऊत, हिरामण गावित, राहुल शार्दुल , चंदर शेवरे, उत्तम शेवरे,वामन शेवरे,विलास शेवरे, सुभाष मौळे, उत्तम मौळे यांनी केली आहे.
स्तनदा मातांची हेळसांड, कारवाई करा
शिरसगाव व ठाणापाडा आरोग्य केंद्रात नसबंदी करण्यासाठी क्षमतेपेक्षा जास्त मातांना आणून त्यांच्या जीवाशी खेळ खेळला जात आहे. त्यामुळे क्षमतेइतक्याच नसबंदी करण्यात याव्यात. शासनाचे टार्गेट पूर्ण करण्याच्या नादात स्तनदा मातांची हेळसांड करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी.
इंजी. सौ. रुपांजली माळेकर, जिल्हा परिषद सदस्य