त्र्यंबकेश्वर – दरवर्षी वाजत येणारा गणपती बाप्पा यावर्षी कोरोनाच्या महामारीने शांततेत आला आहे. सार्वजनिक गणेशोत्सव बंद असल्याने यावर्षी घरोघर गणरायाची स्थापना करण्यासाठी गणेश मुर्ती घेऊन जाणा-या नागरिकांची लगबग दिसत होती. त्याच सोबत परंपरेत खंड पडायला नको म्हणून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणा-या मंडळांनी घराच्या ओसरीवर जमेल तेथे गणेशमुर्तीची स्थापना केली आहे. यंदा पावसातही मोठा उत्साह पहायला मिळाला. यावर्षी दोन फुटांच्या आतच मुर्तीची उंची असल्याने छोट्या मुर्ती अधिक आकर्षक रंगसंगतीत उपलब्ध असल्याचे बाजारपेठेत दिसून आले. घरगुती मखर सजावट देखील अधिक प्रमाणात खरेदी झाली आहे. त्र्यंबक शहरात सकाळ पासून गणेश स्थापना करण्यात येत होती. ग्रामिण भागातील नागरिक मोटारसायकलवर गणेशमुर्ती घेऊन जातांना दिसत होते.