त्र्यंबकेश्वर – शहरासह संपुर्ण तालुक्यात आतापर्यंत ९१ जणांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. तर आणखी १३ रुग्ण बरे होण्याच्या मार्गावर आहेत. त्यापैकी त्र्यंबक शहरात ८ रूग्ण आहेत. आजवर एकूण करोना बाधितांची संख्या ११० पर्यंत पोहचली आहे. त्यात त्र्यंबक शहरात ४९ तर ग्रामिण भागात ६१ रूग्णांचा समावेश आहे. कोरोनाची भीती हळूहळू कमी होत असल्याचे चित्र आहे.
त्र्यंबक नगरपालिकेने घरोघरी सर्वेक्षण सुरू केले आहे. नगराध्यक्ष पुरूषोत्तम लोहगावकर, मुख्याधिकारी संजय जाधव यांनी नगरसेवक आणि कर्मचारी यांच्या सहकार्याने शहरात सर्वेक्षणाचे काम हाती घेऊन करोनाला आळा घालण्यासाठी महत्वपुर्ण पाऊल उचलले आहे. यामध्ये प्रत्येक कुटुंबातील सर्व सदस्यांची माहिती संकलित करण्यात येत आहे. कुटुंबात असलेल्या व्यक्तींना मधुमेह, रक्तदाब, कर्करोग, मुत्राशय विकार, क्षयरोग, एचआयच्ही आदी आजार तसेच ६० वर्षाच्या वरील वय असलेल्या व्यक्तींची माहिती संकलित करण्यात येत आहे. या माहितीच्या आधारे शहरात करोना संसर्गाचा अधिक धोका असलेल्या व्यक्तींची यादी तयार करण्यात येणार आहे. अशा हायरिस्क समजल्या जाणा-या व्यक्तींची नियमित माहिती घेण्यात येईल. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर लक्ष ठेवणे सोपे जाणार आहे. तसेच कोरोनाच्या प्रादुर्भावास नियंत्रणात आणण्यास मदत होणार आहे. शहरातील ८०० कुटुंबांची माहिती संकलित झाली आहे.अद्याप २ हजार कुटुंबांचे सर्वेक्षण करण्याचे बाकी आहे. येत्या आठ दहा दिवसात ते पुर्ण होईल, असे नगरपालिका प्रशासनाने सांगितले आहे.