नाशिक – त्र्यंबकेश्वरचे माजी नगराध्यक्ष धनंजय यादवराव तुंगार यांची येथील एका युवकाने सुरीने गळा कापून हत्या केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. भरदिवसा ही हत्या झाल्याने शहर परिसरात खळबळ उडाली आहे.
बुधवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास तुंगार यांच्या घरी श्राद्ध विधी सुरू होता. त्याचवेळी कुणाचा तरी फोन आला. त्यानंतर तुंगार हे अहिल्या धरणाकडे गेले. तेथे एका व्यक्तीने तुंगार यांच्यावर हल्ला केला आणि सुरीने त्यांचा गळा कापला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तुंगार यांना सोडून गोणदके नावाचा हा युवक थेट पोलिस स्टेशनमध्ये हजर झाला. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत. मात्र, या घटनेमुळे शहर परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. या घटनेमुळे त्र्यंबक शहरात उत्स्फुर्त बंद पाळण्यात येत आहे.
स्वातंत्र्यसैनिक आणि माजी नगराध्यक्ष यादवराव तुंगार यांचे धनंजय हे चिरंजीव आहेत. धनंजय हे दोनवेळा नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यांनी नगराध्यक्षपदही भूषविले होते. धनंजय तुंगार यांचे मोठे बंधू शेखर यांचे दहा दिवसांपूर्वीच कोरोनाने निधन झाले आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. घटनास्थळी हजारोच्या संख्येने नागरिक जमल्याने पोलिसांनी तत्काळ नाशिक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिस मोठी कुमक त्र्यंबकमध्ये दाखल झाली आहे.