त्र्यंबकेश्वर – शहर आणि परिसरात पावसाची दिवसभर संततधार आहे. त्यामुळे परिसरातील नद्या तसेच नाले खळाळून वाहत आहेत. त्यामुळे ब्रह्मगिरी आणि त्याचा परिसर अतिशय चैतन्यदायी बनला आहे. ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी असलेले अहिल्या धरण सध्या ओसांडून वाहत आहे. ब्रह्मगिरी परिसरातील धबधबेही खळाळत आहेत. आहिल्या व गोदावरीचा प्रवाह वाढल्याने गौतमी बेझे धरणाचा साठा झपाट्याने वाढतो आहे. किकवी नदी थेट गंगापूर धरणात पोहचते. ती दुथडी भरून वाहत असल्याने नाशिकचा पाणी प्रश्न निकाली निघणार आहे. जवळपास महिनाभर पाऊस खोळंबला होता. तथापि आता मात्र भात, नगली, वरई या पिकांना जिवदान मिळाले आहे. बळीराजा सुखावला असून पोळ्याच्या तयारीलाही लागला आहे.