नाशिक – त्र्यंबक नाका ते पपाया नर्सरी आणि पपाया नर्सरी ते त्र्यंबक नाका हा एकूण १३ किलोमीटर लांबीचा पॉप अप सायकल ट्रॅक लवकरच होणार आहे. नाशिक स्मार्ट सिटी कंपनीच्यावतीने तो साकारला जाणार आहे. नाशकातील सायकल चळवळीला यामुळे आणखी बळ मिळणार आहे.
नाशिक शहरामध्ये सायकल्सचा वाढता वापर लक्षात घेता येथे सायकलिंगसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. इंडिया सायकल्स फॉर चेंज चॅलेंजच्या अनुषंगाने नाशिक स्मार्ट सिटीने वेबिनारचे आयोजन केले. त्यात स्मार्ट सिटीचे प्रकल्प व्यवस्थापक निखिल भोईर यांनी सांगितले की, १३ किलोमीटर लांबीचा पॉप अप सायकल ट्रॅक लवकर साकारला जाणार आहे. त्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. निधी मिळाल्यानंतर हा ट्रॅक साकारला जाणार आहे. नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर कामगार वर्ग आणि हौशी सायकलिस्ट्स सायकल चालवतात. त्याचा विचार करता येथे सोयिसुविधा करण्याच्या दृष्टीनेही सूचना मांडण्यात आल्या. स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांनी इंडिया सायकल्स फॉर चेंज चॅलेंजबाबत थोडक्यात माहिती विषद केली.
औद्योगिक वसाहतीत हवा
कामगार वर्गाचा विचार करता सदर पॉप अप सायकल ट्रॅक पुढे एमआयडीसीमध्ये नेणे गरजेचे असल्याचे निमाचे अध्यक्ष शशिकांत जाधव यांनी सांगितले. त्याचबरोबर सायकलिंगच्या दृष्टीने सिडकोला अंबड व सातपूर एमआयडीसीसोबत जोडणे गरजेचे असून कंपन्यांपर्यंत सायकल ट्रॅक नेल्यास त्याचा कामगार वर्गाला मोठ्या प्रमाणात फायदा होईल, असेही ते म्हणाले. नाशिकमध्ये सायकलिस्ट्सची संख्या मोठी असून त्यादृष्टीने फोकस करणं गरजेचं असून त्यासाठी निमा, आयमा, सर्वेक्षण आणि सर्वतोपरी मदत करण्यास तयार असल्याचं चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी सांगितले. तसेच डॉ. विलास पाटील, डॉ. प्रविणचंद्र ढाके यांनी भविष्याचा विचार करून त्याप्रमाणे सायकलिंगच्या दृष्टीने शहरातील विविध भागांमध्ये पॉप अप सायकल ट्रॅक, स्लो झोन अशा सुविधा देण्याच्या सूचना केल्या.
या वेबिनारमध्ये नितीन नागरे (नाशिक डीस्ट्रीक्ट सायकलिंग असोसिएशन), धीरज छाजेड (सेक्रेटरी, ई३ ट्रायथलॉन क्लब), यामिनी सुर्या (स्पोर्ट्स, सायकलिंग), प्रा. डॉ. विलास के. पाटील (के. के. वाघ अभियांत्रिकी कॉलेज), प्रा. डॉ. प्रविणचंद्र ढाके (परिवहन अभियांत्रिकी, के. के. वाघ कॉलेज), प्रा. डॉ. प्रदीप जाधव (विभाग प्रमुख, स्थापत्य अभियांत्रिकी, के. के. वाघ कॉलेज), प्रा. डॉ. एम.पी. कदम, (विभाग प्रमुख, मविप्र अभियांत्रिकी कॉलेज), प्रा. स्नेहल चौधरी (मविप्र अभियांत्रिकी कॉलेज), प्रा. दीपक नाठे (मविप्र, अभियांत्रिकी कॉलेज) आदी उपस्थित होते.