पिंपळगाव मोर – ‘सकळही तीर्थे निवृत्तीच्या पायी’या चरणा प्रमाणे पौष वारीसाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून वारकरी व दिंड्या आठ-दहा दिवस अगोदरच निवृत्तीनाथांच्या वारीसाठी दरवर्षी मार्गस्थ होत असतात.यंदाच्या कोरोनाच्या महामारीमुळे गेल्या दहा महिन्यापासून बंद असलेली मंदिरे जरी आता उघडली गेली असली तरीही देवस्थानाच्या यात्रांना प्रशासनाने परवानगी दिलेली नाही.पंढरपूरची आषाढी एकादशी त्याचप्रमाणे आळंदीची यात्रा देखील कोरोनाच्या प्रदूर्भावामुळे स्थगित करण्यात आली तसेच संचारबंदी लागू करून देवस्थानाच्या सीमा करण्यात आल्या होत्या.
यंदाच्या पौष वारीच्या निमित्ताने अजूनही खुल्या यात्रेस परवानगी नसली तरीही आळंदी, देहू,नेवासा,राहाता,अहमदनगर आदी भागांतून ज्या दिंड्या मार्गस्थ होत असतात.यावर्षी वारीची परंपरा अखंडित राहावी यासाठी दिंड्यांतील काही मोजके वारकरी त्र्यंबकेश्वरकडे घोटीमार्गे चालले आहेत.
सालाबादप्रमाणे होणार दिंडी सोहळा रद्द असली तरीही दिंडीतील मोजके वारकरी वारी अगोदरच त्र्यंबकनगरीकडे आगेकूच करतांना दिसत असून दर्शन घेऊन लगेचच परतत आहेत. दिंडी सोहळा नसल्यामुळे रस्त्याने वारकऱ्यांची फराळ व जेवनावाचून हाल होत आहेत. गावागावांतील काही होतकरू सांप्रदायिक नागरिक वारकऱ्यांना जेवण देत आहेत.
पिंपळगाव मोर येथून सालाबादप्रमाणे होणारा दिंडी सोहळा देखील स्थगित झाला असून दिंडीतील काही प्रमुख वारकरी आदिंनी ‘सर्वतीर्थ टाकेद’येथे प्रदक्षिणा व दर्शनानंतर त्र्यंबकेश्वर येथे कुशावर्तावर जाऊन विधिवत पूजा केली.प्रदक्षिणा मार्गावरून प्रदक्षिणेंनंतर निवृत्तीनाथांचे दर्शन घेतले.वारीची परंपरा अखंडित ठेवून मोजक्या वारकाऱ्यांमध्ये वारी करून सायंकाळी परतीचा प्रवास केला.