पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या शनिवारी (२८ नोव्हेंबर) पुणे दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते येथील सीरम इन्स्टिट्युटला भेट देणार आहेत. त्यामुळे याच दिवशी ते भारतीय कोरोना लसीची घोषणा करणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे त्रिपुरारी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला भारतीयांना ही गुडन्यूज मिळू शकते.
येथील सीरम इन्स्टिट्यूट ही इंग्लंडच्या ऑक्सफर्ड विद्यापीठासोबत कोरोना लस निर्मिती करीत आहे. ही लस अंतिम टप्प्यात आहे. भारतात १० कोटी डोस उपलब्ध करण्याबाबत इन्स्टिट्यूट प्रयत्नशील आहे. तसे नियोजन सध्या सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सीरम इन्स्टिट्यूटला येत्या शेनिवारी भेट देणार आहेत. त्यामुळे या भेटीत ते भारतीय कोरोना लसीची घोषणा करणार का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे. पुण्याचे विभागीय महसूल आयुक्त सौरभ राव यांनीही त्यास दुजोरा दिला आहे.
दरम्यान, सीरम इन्स्टिट्यूटला डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात अनेक देशांचे राजदूत भेट देणार आहेत. त्यामुळे इन्स्टिट्यूटमधील घडामोडींना अधिक वेग आला आहे. या भेटीत १०० देशांचे राजदूत सहभागी होणार असल्याचे सांगितले जात आहे.