दिंडोरी – पंचायत समिती कर्मचाऱ्यास शिवीगाळ करणाऱ्या शिक्षकाविरोधात तालुका शिक्षक समन्वय समिती एकत्र आली आहे. याप्रकरणी समितीने गटशिक्षणाधिकारी, गटविकास अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडे निवेदन दिले आहे. तसेच, या शिक्षकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दिंडोरी तालुका शिक्षक समन्वय समितीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील लिपीक बी. बी. झिरवाळ यांना महेंद्र जाधव या शिक्षकाने वैद्यकीय बिलासंदर्भात फोन केला. मात्र, यावेळी या शिक्षकाने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच या संभाषणाची क्लिप समाजमाध्यमांवर व्हायरल केली. त्यामुळे लिपीक झिरवाळ यांना नाहक बदनामीस सामोरे जावे लागत आहे. याप्रकरणी सदर शिक्षकाचा दिंडोरी तालुका शिक्षक समन्वय समितीच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. या शिक्षकाची वर्तणूक नेहमीच वादग्रस्त राहिली आहे. वरिष्ठ अधिकारी, सहकर्मचारी यांच्याशी विनाकारण वाद घालणे, कायदेशीर कारवाईत अडकवण्याचे प्रयत्न करणे, नेहमी आपल्या गैरवर्तनाने शिक्षक पेशाला काळीमा फासण्याचे काम करणे, हे जाधव यांच्याकडून घडत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.