नवी दिल्ली ः टीम इंडिया क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली नव्या वादात अडकण्याची चिन्हे दिसत आहेत. त्याच्यावर आयसीसीकडून कारवाई होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. भारत-इंग्लंडदरम्यान शेवटच्या ट्वेंटी-ट्वेंटी सामन्यादरम्यानचे हे प्रकरण आहे.
झाले असे की, इंग्लंडचा फलंदाज जोस बटलर बाद झाल्यानंतर विराट कोहलीसोबत वाद झाला. दोन्ही बाजूंनी शब्दांचे आदान प्रदान झाले. बाद होण्यापूर्वी जोस बटलरने ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेटमधील आघाडीचा फलंदाज डाविड मलानसोबत चांगली भागीदारी केली. परंतु, बटलर ५२ धावा काढून भुवनेश्वर कुमारच्या चेंडूवर बाद झाला. जोस बटलर बाद झाल्यानंतर तो विराट कोहलीशी बोलत असल्याचे दिसले. या घटनेमुळे विराट कोहलीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मैदानात शब्दांची लढाई कोणी सुरू केली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. बटलर तंबूत परतत असताना वेळोवेळी मागे पाहून विराट कोहलीला उत्तर देत होता. या वादविवादानंतर जोस बटलर मैदानाबाहेर गेला. त्यानंतर विराट कोहली पंच आणि इंग्लंडचा फलंदाज जॉनी बेयरस्टोसोबत बराच वेळ बोलताना दिसला.
या घटनेमुळे विराट कोहलीच्या मैदानावरील वर्तनाबाबत पुन्हा लक्ष केंद्रित झाले आहे. काही दिवसांत विशेष करून इंग्लंडच्या दौ-यात विराट कोहलीचे वर्तन चौकशीच्या फे-यात आले आहे. दुस-या कसोटी सामन्यात मैदानावरील पंचांसोबत वाद घातल्यामुळे त्याच्यावर एक कसोटी सामन्यात निलंबनाची टांगती तलवार होती. परंतु, तो त्या आरोपातून वाचला होता. आताच्या जोस बटलरसोबतच्या वादाबाबत निर्णय झाल्यास त्याच्यावर बंदी लागू शकते.
विराटवर दोन डिमेरिट पॉइंट
सद्यस्थितीत भारतीय कर्णधार विराट कोहलीवर दोन सक्रिय डिमेरिट पॉइंट आहेत. आयसीसीच्या डिमेरिट पॉइंट नियमानुसार, जर कोणताही खेळाडू २४ महिन्यांमध्ये चार किंवा त्याहून अधिक डिमेरिट पॉइंटपर्यंत पोहोचल्यास डिमेरिट पॉइंटचं रूपांतर सस्पेंन्शन पॉइंटमध्ये होते. परिणामी दोन निलंबन गुणांमुळे खेळाडूवर एक कसोटी किंवा दोन एकदिवसीय सामन्यावर बंदी घातली जाऊ शकते.
आयसीसीच्या आचारसंहितेचे उल्लंघन
बटलरसोबत झालेल्या शाब्दिक चकमकीमुळे आयसीसीच्या आचारसंहितेंतर्गत अनुच्छेद २.५ च्या उल्लंघनाचा एक आरोप विराट कोहलीवर लावला जाऊ शकतो. यामध्ये भाषा, हावभाव किंवा इशा-यांचा वापर करणे असमानता किंवा एका आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान बाद झाल्यानंतर एका फलंदाजाच्या आक्रमक प्रतिक्रियेला प्रक्षोभित करू शकते.
बटलरवरही एक डिमेरिट पॉइंट
सद्यस्थितीत जोस बटलरच्या खात्यातही एक सक्रिय डिमेरिट पॉइंट आहे. जर विराट कोहलीला दोन किंवा त्याहून अधिक डिमेरिट पॉइंट मिळाल्यास विराटवर आणखी कडक कारवाई होऊ शकते. इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दोन सामन्यांत बंदी लागू शकते. दरम्यान, आयसीसीकडून या घटनेवर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.