नाशिक – नाशिक शहर परिसरात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. याची दखल घेत राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी कोरोना आढावा बैठकीत नाशिक महापालिका प्रशासनाला चांगलेच खडसावले. याची दखल घेत महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी तातडीने सर्व अधिकाऱ्यांनी बैठक घेतली. त्यात कोरोनाचा आढावा घेण्यात आला. सध्या महापालिका प्रशासन काय करते आहे आणि काय करायला हवे, याचा आढावा आयुक्तांनी घेतला. या बैठकीनंतर आयुक्तांनी सांगितले की, सौम्य लक्षणे असलेल्या कोरोना बाधितांवर घरीच उपचार करण्यात येतात. गृह विलगीकरणात असलेले हे कोरोना बाधित पूर्णपणे नियम पाळत नाहीत. ते घराबाहेर पडतात. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. ही बाब अतिशय गंभीर आहे. त्यामुळेच जे कोरोना बाधित गृह विलगीकरणाबाहेर आढळतील त्यांना तातडीने कोविड सेंटरमध्ये भरती करण्यात येईल, तसेच त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा आयुक्तांनी दिला आहे. याचे कसोशीने पालन करण्याचा सज्जड दमही आयुक्तांनी सर्व विभागीय अधिकाऱ्यांना आणि मनपा कर्मचाऱ्यांना दिला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी काही निर्बंध लावले जात आहेत. मात्र, ते पुरेसे नाहीत. कोरोनाचा संसर्ग रोखायचा असेल तर सर्व कोरोना नियमांचे कसोशीने पालन व्हायला हवे, असेही आयुक्तांनी बजावले आहे.